मुंबई: सुपर फोर गटात भारताचा दक्षिण कोरिया विरुद्धचा (India vs South Korea) सामना 4-4 असा ड्रॉ झाला. गोफ फरकामधील अंतरामुळे दक्षिण कोरियाने आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या (Asia Cup Hockey 2022) अंतिम फेरीत प्रवेश केला. आता मलेशिया विरुद्ध ते अंतिम सामना खेळतील. इंडोनेशियामध्ये (Indonesia) ही स्पर्धा सुरु आहे. भारत आता कास्य पदकासाठी जपाना विरुद्ध खेळेल. संपूर्ण सामन्यात भारत आणि दक्षिण कोरिया दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. पहिल्या क्वार्टरच्या 8 व्या मिनिटाला नीलम संजीपने पेनल्टी कॉर्नरवर गोल डागला. दक्षिण कोरियाने त्यानंतर भारतीय गोल क्षेत्रात हल्लाबोल करत दोन गोल डागले. दिप्सन टर्कीने 20 व्या मिनिटाला गोल डागून बरोबरी साधून दिली. गतविजेत्या भारताला फायनलमध्ये प्रवेशासाठी आजच्या सामन्यात काहीही करुन दक्षिण कोरियावर विजय आवश्यक होता.
भारताकडून नीलम संजीपने 8 व्या, दिप्सन टर्कीने 20 व्या, गौडाने 21 व्या आणि मारेस्वीरने 36 व्या मिनिटाला गोल केले. दक्षिण कोरियाकडून जोंगह्यूनने 12 व्या, चेयोन जी ने 17 व्या, जूंगहूने 27 व्या आणि मांजे जुंगने 43 व्या मिनिटाला गोल केला.
भारताने आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताला गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही. आठव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचं नीलम संजीपने गोलमध्ये रुपांतर केलं. या क्वार्टरमध्ये दक्षिण कोरियाने भारतावर सरशी साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर त्यांनी गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
भारतीय हॉकी संघाने जपानला हरवून सुपर 4 स्टेजची सुरुवात केली होती. पहिल्या मॅचमध्ये भारताने जपानला 2-1 ने हरवलं होतं. ग्रुप स्टेजमध्ये जपानने भारताचा 2-5 असा पराभव केला होता. भारताने जपान विरुद्ध विजय मिळवून लीग स्टेजमधल्या पराभवाचा हिशोब चुकता केला होता. त्या सामन्यात मंजीत आणि पवन या दोघांनी भारतासाठी दोन गोल केले होते. मंजीतने सातव्या आणि पवनने 34 व्या मिनिटाला गोल केला होता. जपानसाठी ताकुमा नीवाने 17 व्या मिनिटला गोल केला होता. जपानला या सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण त्यांना फक्त एका पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नव्हतं.