Asian Games : तिलक वर्मा याने पूर्ण केला आईला दिलेला शब्द, जर्सी वर करत केलं अनोखं सेलिब्रेशन Watch Video
Asian Games 2023, India In Final : एकीकडे वनडे वर्ल्डकप स्पर्धेची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्ण पदक मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशला पराभूत केलं आणि अंतिम फेरीत स्थान मिळवलं.
मुंबई : एशियन गेम्स स्पर्धेत महिला क्रिकेट संघानंतर आता पुरुष संघही सुवर्ण पदकाच्या शर्यतीत आहे.उपांत्य फेरीत बांगलादेशला पराभूत करत टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला 20 षटकात 9 गडी घेत 96 धावांवर रोखलं. भारताने हे विजयी आव्हान अवघ्या 9.2 षटकात पूर्ण केलं आणि अंतिम फेरीत स्थन मिळवलं आहे. या सामन्यात तिलक वर्मा याने 26 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. तसेच अर्धशतक त्याने अनोख्या अंदाजात सेलिब्रेट केलं. सामन्यानंतर त्याने या मागचं कारण देखील स्पष्ट केलं.
तिलक वर्माचं अर्धशतकानंतर अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
तिलक वर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगलाच चमकला होता. मात्र त्यानंतर त्याला सूर गवसला नाही. टीम इंडियात काही सामने खेळण्याची संधी मिळाली खरी पण काही खास करू शकला नाही. पण एशियन गेम्समध्ये त्याची गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर आली आहे. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने जर्सी वर करत सेलिब्रेशन केलं. तसेच टॅटू दाखवला आणि आकाशाकडे बघत हात जोडले.
For ma, who brings me out of tough phases, who's always stood by me and is my biggest motivation ❤️🤗
— Tilak Varma (@TilakV9) October 6, 2023
सामन्यानंतर तिलक वर्माला या अनोख्या सेलिब्रेशन बाबत प्रश्न विचारण्यात आला. तिलक वर्माने सांगितलं की “हे सेलिब्रेशन माझ्या आई वडिलांसाठी होतं. मागच्या काही सामन्यात खास करू शकलो नव्हतो म्हणून उदास झालो होतो. मी शब्द दिला होता की पुढच्या सामन्यात अर्धशतक करणार. हा टॅटू माझ्या आई बाबांचा आहे. तसेच आनंदाज बेस्ट फ्रेंड सॅमीलाही सहभागी केलं.”
बांगलादेशकडून कोणीही हवी तशी कामगिरी करू शकलो नाही. परवेज होसेन इमॉन, जकर अली आणि रकिबुल हसन सोडले तर बाकी सर्व फलंदाज एकेरी धावा करून बाद झाले. भारताकडून रविश्रीनिवासन साई किशोरने सर्वाधिक 3 गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने 2, अर्शदीप सिंग 1, तिलक वर्मा 1, रवि बिष्णोई 1, शाहबाज अहमद 1 असे गडी बाद केले. भारताकडून आघाडीला आलेला यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी विजयी धावा केल्या.