आफ्रिदीवर दोन वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला असून एका खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. बोर्डाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता 12 सप्टेंबर 2024 पर्यंत खेळाडूला खेळता येणार नाही.
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला असून एका खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. बोर्डाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता 12 सप्टेंबर 2024 पर्यंत खेळाडूला कोणत्याही क्रिकेटमध्ये खेळता येणार नाही. बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूवर लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहे हा खेळाडू? बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूचं नाव आसिफ आफ्रिदी असं आहे. आसिफ आफ्रिदीवर कलम 2.4.10 आणि कलम 2.4.4 चे उल्लंघन केल्या प्रकरणी ही बंदी घालण्यात आली आहे. यामधील पहिल्या कलमानुसार ही बंदी दोन वर्ष आणि दुसऱ्या कलमानुसार सहा महिने असणार आहे. आसिफ आफ्रिदीने 35 प्रथम श्रेणी, 42 लिस्ट ए आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 118, 59 आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत.
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आसिफ आफ्रिदीचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकलं नव्हतं. याआधी त्याने काश्मीर प्रीमियर लीगमध्ये रावळकोट हॉक्स संघाकडून खेळताना मॅच फिक्सिंग केली होती. पीएसएल लीगमध्येही आसिफ खेळला असून मुलतान के सुलतान या संघाचा खेळाडू आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आफ्रिदीवर जे आरोप लावले आहेत. त्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, मात्र त्याला निलंबित केल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी याावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नजम सेठी? आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी घालून निलंबित करून पीसीबीला काही आनंद होत नाही. मात्र अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही खेळाडूला सहनशीलता दाखवता येणार नाही. अशा प्रकारची कारवाई केल्याने इतर क्रिकेटपटूंसाठी हा मोठा संदेश जात असल्याचं नजम म्हणाले.