AUS vs AFG : पायात गोळा आला तरी नडला, ग्लेन मॅक्सवेलने द्विशतकी खेळीनंतर सांगितला सर्व प्लान
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं गणित जवळपास स्पष्ट झालं आहे. भारत, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिायने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या तोंडून विजयाचा घास खेचून आणला. दुखापतग्रस्त ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या आशेवार पाणी सोडलं.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात ग्लेन मॅक्सवेलसारखी खेळी अद्याप तरी क्रीडाप्रेमींना अनुभवता आली नव्हती. अगदी गमावलेला सामना खेचून आणि तेही दुखापतग्रस्त असताना..अगदी एखाद्या चित्रपटातील क्लायमॅक्स सारखं होतं. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. 50 षटकात 5 गडी गमवून 291 धावा केल्या आणि विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियान 3 गडी आि 19 चेंडू राखून पूर्ण केलं. पण ऑस्ट्रेलियाची एकवेळ अशी स्थिती होती की सामना गेल्यातच जमा होता. 91 या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचे 7 गडी बाद झाले होते. पण ग्लेन मॅक्सवेलने एकहाती सामना खेचून आणला. 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 201 धावा केल्या. अफगाणिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलला मॅच विनिंग खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी त्याने नेमकं काय झालं ते सांगितलं.
“आज जेव्हा मी फिल्डिंग करत होतो तेव्हा खूपच गरमी होती. गरमीमुळे मला जास्त एक्सरसाईज करता आली नाही. उकाड्यामुळे मी हैराण झालो होतो. मी क्रिजवर थांबू इच्छित होतो कारण पायात हालचाल होत राहील. 91 धावांवर 7 गडी बाद झाल्यानंतर मी याबाबत जास्त विचार केला नव्हता. मी बॅटिंग प्लानिंगनुसार खेळपट्टीवर जितकं थांबता येईल तितकं थांबण्याच्या प्रयत्नात होतो.”, असं ग्लेन मॅक्सवेल याने सांगितलं.
‘मी माझे शॉट्स खेळू इच्छित होतो. एलबीडब्ल्यूवेळी बॉल स्टंपच्या वर जात होता. त्यामुळे मला जास्त आत्मविश्वास आला. अफगाणिस्तानने चांगली गोलंदाजी केली. पण आश्चर्य या गोष्टीचं होतं की, पहिले दोन सामने गमावल्याने लोकांनी आम्हाला पाठ दाखवली होती. पण एक टीम म्हणून आम्हाला विश्वास होता.’, असं ग्लेन मॅक्सवेल याने पुढे सांगितलं. स्पर्धेतील सुरुवात खराब झाली असली तर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. 16 नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यापूर्वी 1999 वनडे वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले होते. त्यावेळेस ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला होता. तसेच दक्षिण अफ्रिकेचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं.