WTC Points Table : टीम इंडियाला पराभवानंतर सर्वात मोठा झटका, ऑस्ट्रेलियाला फायदा
Australia vs India 2nd Test : टीम इंडियाला अॅडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या डे नाईट टेस्ट मॅचमधील तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाला या पराभवामुळे मोठा झटका लागला आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीतील सातव्या सत्रातच 10 विकेट्सने पराभूत केलं. यजमानांनी यासह 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह युवा फलंदाजही अपयशी ठरले. टीम इंडियाने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 180 आणि 175 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 19 धावांचं आव्हान मिळालं होतं, जे त्यांनी एकही विकेट न गमावता अवघ्या काही षटकांमध्ये पूर्ण केलं आणि पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेतला.
टीम इंडियाला मोठा झटका
टीम इंडियाला या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका लागला. टीम इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये कमावलेलं सर्वकाही एका झटक्यात गमावलं. टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या साखळीतील पॉइंट्स टेबलमधील सिंहासह गमावलं. टीम इंडियाची पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावरुन थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली. तर ऑस्ट्रेलियाने विजयासह तिसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानी झेप घेतली. ऑस्ट्रेलियाचा या साखळीतील 14 सामन्यांमधील हा नववा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाचे पीसीटी पॉइंट्स हे 60.71 इतके झाले आहेत. तर टीम इंडियाने या साखळीत 16 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 6 सामने गमावले आहेत. टीम इंडियाचे पीसीटी पॉइंट्स हे 57.29 इतके आहेत.
टीम इंडियाला या पराभवानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशीप फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला हा जून महिन्यात लॉर्ड्स येथे खेळवण्यात येणार आहे. पॉइंट्स टेबलमधील अव्वल 2 संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. टीम इंडियाला या साखळीत उर्वरित 3 सामने ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळायचे आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी हे तिन्ही सामने अटीतटीचे असणार आहेत. त्यामुळे रोहितसेनेचा चांगलाच कस लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.