AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार विजय, टीम इंडियाचा 10 विकेट्सने धुव्वा, मालिकेत 1-1 ने बरोबरी
Australia vs India 2nd Test Match Result Highlights In Marathi : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि डे नाईट पिंक बॉल टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियावर मात केली आहे. यजमानांनी यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेतील दुसऱ्या पिंक बॉल टेस्ट मॅचमधील तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाचा धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 19 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता 3.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पहिल्या सामन्याचा हिशोब क्लिअर केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड आणि पॅट कमिन्स हे त्रिकुट ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले. तर भारताचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील हा सलग चौथा पराभव ठरला. न्यूझीलंडने रोहितच्या नेतृत्वात भारताला 3-0 ने व्हाईटवॉश दिला. त्यानंतर आता हिटमॅनच्या कॅप्टन्सीत भारताला पुन्हा पराभूत व्हावं लागलं आहे.
सामन्याचा आढावा
टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुलाच्या जन्मानंतर परतलेला नियमित कर्णधार रोहित शर्माने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर रोहितसेना 180 धावांवर ढेर झाली. टीम इंडियासाठी युवा नितीश रेड्डी याने सर्वाधिक 42 धावांचं योगदान दिलं. इतरांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. टीम इंडियाचा डाव 180 धावांवर आटोपला. मिचेल स्टार्क याने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने 180 धावांच्या प्रत्युत्तरात ट्रेव्हिस हेड याने केलल्या स्फोटक शतकाच्या जोरावर 300 पार मजल मारली. ट्रेव्हिस हेड याने 141 बॉलमध्ये 140 रन्स केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 87.3 ओव्हरमध्ये 337 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 157 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाच्या फलंदाजांकडून दुसर्या डावात कमबॅकची अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर फलंदाज ढेर झाले. रोहित, विराट आणि इतर फलंदाजांनी निराशा केली.नितीश रेड्डी यानेच दुसर्या डावातही सर्वाधिक 42 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 157 धावांच्या प्रत्युत्तरात रडतखडत 36.5 ओव्हरमध्ये 175 धावांपर्यंत पोहचता आलं. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात कॅप्टन पॅट कमिन्स याने 5 विकेट्स घेतल्या. तर स्कॉट बोलँड याने 3 आणि मिचेल स्टार्क याने 2 विकेट्स मिळवल्या. ऑस्ट्रेलियाला 19 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान सलामी जोडीनेच पूर्ण केलं. नॅथन मॅकस्वीनी याने 10 आणि उस्मान ख्वाजा याने 9 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार विजय, मालिकेत बरोबरी
Australia win the second Test and level the series.#TeamIndia aim to bounce back in the third Test.
Scoreboard ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/Tc8IYLwpan
— BCCI (@BCCI) December 8, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.