AUS vs IND : कॅप्टन रोहित शर्माची दुसऱ्या कसोटीआधी मोठी घोषणा, अखेर तो निर्णय घेतलाच
Australia vs India 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या रोहितने काय म्हटलं?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 6 ते 10 डिसेंबर दरम्यान अॅडलेड ओव्हल येथे दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा दिवस रात्र सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यातील गैरहजेरीनंतर दुसऱ्या सामन्यापासून नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. कॅप्टन रोहितने या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा केली आहे. रोहितने या निर्णयासह अनेक भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत. रोहितने यशस्वी जयस्वाल याच्यासह केएल राहुल हाच ओपनिंग करणार असल्याचं पत्रकार परिषदेतून जाहीर केलं आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“मी घरी माझ्या लहान मुलाला हातात घेऊन केएल राहुलची बॅटिंग पाहत होतो. केएल राहुल अप्रितम खेळला. त्यामुळे केएलचं स्थान बदलण्याची गरज नाही. त्यामुळे केएल त्या स्थानी खेळण्यासाठी पात्र आहे”, असं रोहितने स्पष्ट केलं. रोहित आणि त्याची पत्नी रितीका सजदेह या दोघांना 15 नोव्हेंबरला पुत्ररत्न प्राप्त झालं. तर पहिला सामना हा 22 नोव्हेंबरपासून खेळवण्यात आला. मात्र अशा आनंदाच्या क्षणी कुटुंबासह अधिक वेळा घालवता यावा, यासाठी रोहित पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. अशात रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराहने नेतृत्व केलं आणि भारताला विजयी सुरुवात करुन दिली.
तसेच रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत केएलने यशस्वीसह ओपनिंग केली होती. यशस्वी आणि केएल या सलामी जोडीने दुसऱ्या डावात 201 धावांची सलामी भागीदारी करत टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात करुन दिली होती. तसेच केएल आणि यशस्वी या जोडीने द्विशतकी भागीदारीसह इतिहास रचला होता. टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली होती. त्यामुळे कॅप्टन रोहित स्वत: ओपनिंगला न येता केएलसाठी त्याग करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. अखेर रोहितने केएलच ओपनिंग करणार असल्याचं जाहीर करत टीमसाठी आपल्या जागेचा त्याग केला आहे.न
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.