R Aswhin : आर अश्विन याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, टीम इंडियाला धक्का
Ravichandra Ashwin Retirement : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आर अश्विन याने तिसर्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराउंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. उभयसंघातील तिसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि आर अश्विन या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. अश्विनने या पत्रकार परिषदेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करत असल्याचं जाहीर केलं.
अश्विनने मालिकेदरम्यान एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. अश्विनच्या या निर्णयासह त्याच्या 13 वर्षीय क्रिकेट कारकीर्दीचा अंत झाला आहे. टीम इंडियाची गेली अनेक वर्ष सेवा करणाऱ्या या दिग्गज खेळाडूला निरोपही देता न आल्याची खंत यामुळे व्यक्त केली जात आहे.
कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मा यानेही पत्रकार परिषदेत अश्विनच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. “अश्विनचा हा वैयक्तिक निर्णय आहे. त्याच्या या निर्णयाचा आदर सन्मान करायला हवं. मी पर्थमध्ये आल्यानंतर अश्विनने मला निवृत्त होणार असल्याचं सांगितलं होतं. अश्विन आता गुरुवारी 19 नोव्हेंबरला मायदेशी परतणार आहे”, असं रोहितने म्हटलं.
आर अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙔𝙤𝙪 𝘼𝙨𝙝𝙬𝙞𝙣 🫡
A name synonymous with mastery, wizardry, brilliance, and innovation 👏👏
The ace spinner and #TeamIndia‘s invaluable all-rounder announces his retirement from international cricket.
Congratulations on a legendary career, @ashwinravi99 ❤️ pic.twitter.com/swSwcP3QXA
— BCCI (@BCCI) December 18, 2024
अश्विनची कसोटी कारकीर्द
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलेडमध्ये झालेला दुसरा कसोटी सामना हा अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. आर अश्विन याने 6 नोव्हेंबर 2011 रोजी विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. अश्विनने या दरम्यान एकूण 106 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. अश्विनने या दरम्यान 200 डावांमध्ये 537 विकेट्स घेतल्या. अश्विनने 37 वेळा 5 आणि 8 वेळा 10 विकेट्स घेतल्या. तसेच अश्विनने 151 डावांमध्ये बॅटिंग करताना 6 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 3 हजार 503 धावा केल्या. अश्विनची 124 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. अश्विनने या दरम्यान 23 षटकार आणि 399 चौकार ठोकले.
अश्विनची वनडे आणि टी 20 कारकीर्द
दरम्यान अश्विन 116 एकदिवसीय आणि 65 टी 20i सामने खेळला आहे. अश्विनने वनडेमध्ये 707 धावा करण्यासह 156 विकेट्स घेतल्या. तर ऑलराउंडरने टी 20i मध्ये 72 फलंदाजांना बाद केलं. तसेच 184 धावा केल्या.