AUS vs IND : टीम इंडियाच्या गोलंदाजांचा धमाका, कांगारुंना 181वर गुंडाळलं, 4 धावांची आघाडी
Aus vs Ind 5th Test 2nd Day 2nd Innings : टीम इंडियाच्या 185 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी 181वर गुंडाळत सामन्यात कमबॅक केलं आहे. टीम इंडियाच्या बॉलर्सनी शानदार कामगिरी केली.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सिडनीत खेळवण्यात येत असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी चाबूक बॉलिंग केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसर्या दिवशी 9 झटके देत ऑलआऊट केलं आणि नाममात्र का होईना पण 4 धावांनी आघाडी घेण्यात यश मिळवलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 185 प्रत्युत्तरात 1 विकेट गमावून 9 धावा केल्या होत्या. त्यानंतर आज 4 जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने झटके दिले. टीम इंडियाने अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी रवींद्र जडेजा याचा अपवाद वगळता इतर सर्वांनी विकेट्स मिळवल्या.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
ऑस्ट्रेलियाकडून फक्त 5 जणांनाच दुहेरी आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियासाठी डेब्यूटंट ब्यू वेबस्टर याने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 33 धावांचं योगदान दिलं. ओपनर सॅम कोनस्टास याने 23 धावा जोडल्या. विकेटकीपर एलेक्स कॅरीने 21 आणि कॅप्टन पॅट कमिन्सने 10 रन्स केल्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी इतरांना दुहेरी आकडा गाठण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियासाठी डोकेदुखी असणाऱ्या ट्रेव्हिस हेड याला मोहम्मद सिराजने आऊट केलं. सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन जसप्रीत बुमराह आणि नितीश रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
कांगारुंचं पॅकअप, भारतीय गोलंदाजांचा धमाका
Tea on Day 2 in Sydney!
Mohd. Siraj with the final wicket and Australia are all out for 181 in the 1st innings.#TeamIndia with a lead of 4 runs.
Scorecard – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/ksQazID2Do
— BCCI (@BCCI) January 4, 2025
दरम्यान त्याआधी टीम इंडियासाठी पहिल्या डावात ऋषभ पंत याने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा याने 26 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी कॅप्टन जसप्रीत बुमराहने 22 धावा जोडल्या. तसेच शुबमन गिलने 20 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 72.2 ओव्हरमध्ये 185 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियासाठी स्कॉट बॉलँड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने तिघांना आऊट केलं. कॅप्टन पॅट कमिन्सने 2 विकेट्स मिळवल्या. तर नॅथन लायनला 1 विकेट मिळाली.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.