AUS vs IND: टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा वचपा घेतलाच, 24 धावांनी विजय
Australia vs India: टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे.
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 मधील सामन्यात ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारुंना 7 विकेट्स गमावून 181 धावांपर्यंतच पोहचता आलं. टीम इंडियाचा हा सलग सहावा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलचा वचपा घेतला आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जोरात सुरुवात केली. अर्शदीप सिंहने डेव्हिड वॉर्नरला 6 धावांवर आऊट केलं. त्यानतंर मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 बॉलमध्ये 81 धावांची भागीदारी केली.या भागीदारीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. मात्र कुलदीप यादवने मिचेल मार्शचा काटा काढला. बाउंड्री लाईनवर अक्षर पटेलने अफलातून कॅच घेत मार्शला 37 धावांवर आऊट केलं.
त्यानंतर हेडने मॅक्सवेलसह तिसऱ्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. मॅक्सवेलला कुलदीप यादवने 20 धावांवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर टीम इंडियांने कांगारुंना ठराविक अंतराने झटके दिले. मात्र ट्रेव्हिस हेड दुसऱ्या बाजूला चिटकून होता. त्यामुळे टीम इंडियाला टेन्शन होतं. मात्र ही डोकेदुखी जसप्रीत बुमराहने घालवली. बुमराहने हेडला कॅप्टन रोहितच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 43 चेंडूत 76 धावा केल्या. हेडच्या विकेटनंतर टीम इंडियाने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. हेडनंतर पुढील अर्थात 18 व्या ओव्हरमध्ये मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिड दोघे आऊट झाले. अर्शदीपने या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. मॅथ्यूने 1 आणि डेव्हिड 15 धावा केल्या. त्यानंतर पॅट कमिन्स आमि मिचेल स्टार्कने विजय मिळलून देण्याचा प्रयत्न केले मात्र तोवर उशिर झाला होता. टीम इंडियाने अशाप्रकारे सामना जिंकला. टीम इंडियाकडून अर्शदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलिया कॅप्टन मिचेल मार्श याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. विराट कोहलीला खातंही उघडता आलं नाही. ऋषभ पंत 15 धावा करुन माघारी परतला. तर सूर्यकुमार यादव 31 आणि शिवम दुबेने 28 धावा केल्या. तर हार्दिक पंड्या 27 आणि रवींद्र जडेजा 9 धावांवर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टोयिनस या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूडने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.