IND vs AUS | टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा! पहिला सामना कुठे?
India Tour of Australia | टीम इंडियाने गेल्या मालिकेत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर आता या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
कॅनबेरा | क्रिकेट वर्तुळात सध्या आयपीएल आणि आयपीएलची चर्चा सुरु आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्याने होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा पर्थमध्ये आयोजित केला जाणार आहे. उभयसंघातील या मालिकेची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार, टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामने हे एडलेड, ब्रिस्बेन, मेलब्रन आणि सिडनी येथे आयोजित करण्यात आले आहेत. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीचा भाग आहे.
वृत्तानुसार, मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. त्यानंतर एडलेडमध्ये डे नाईट सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये उभयसंघात चढाओढ पाहायला मिळेल. तर चौथा सामना हा बॉक्सिंग डे टेस्ट असणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये पार पडेल. नववर्षातील पहिला आणि मालिकेतील पाचवा सामना हा सिडनीत आयोजित करण्यात आला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या दौऱ्याबाबत ऑस्ट्रेलिया मार्चनंतर वेळापत्रकाची तारीख जाहीर होऊ शकते. टीम इंडियाचा यंदाचा दौरा हा ऐतिहासिक असणार आहे. कारण 1991-92 नंतर पहिल्यांदाच 5 सामन्यांची मालिका कसोटी मालिका उभयसंघात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने तेव्हा टीम इंडियाचा 4-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला होता.
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध गेल्या दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केली होती. विराट कोहली याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं होतं. टीम इंडियाने पिछाडीवरुन आघाडी घेतली. टीम इंडियाने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला घरात घुसून पराभूत केलं होतं. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली होती.
टीम इंडिया नंबर 1
दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. टीम इंडियाने या साखळीत एकही मालिका गमावली नाही. टीम इंडियाने या साखळीत 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. तर एक सामना हा बरोबरीत सोडवण्यात यश आलं आहे.