AUS vs PAK : कॅप्टन पॅट कमिन्सची निर्णायक खेळी, ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय
Australia vs Pakistan 1st Odi Match Result And Highlights In Marathi : ऑस्ट्रेलियाने मायदेशातील एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली आहे. पॅट कमिन्स याने केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर कांगारुंनी पाकिस्तानवर 2 विकेट्सने मात केली.
मोहम्मद रिझवान याच्या कॅप्टन्सीच्या नव्या प्रवासाची सुरुवात ही पराभवाने झाली आहे. ऑस्ट्रेलियाने रंगतदार झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कॅप्टन पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. कमिन्सने निर्णायक क्षणी नाबाद 32 धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाला विजयी सुरुवात करुन दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला झटपट 2 झटके दिले. मॅथ्यू शॉर्ट 1 आणि जॅक फ्रेझर मॅकग्रुक 16 धावांवर आऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 28 अशी झाली होती. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि जोश इंग्लिस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. स्टीव्हन स्मिथ 44 धावा करुन माघारी परतला. इथून ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी झाली. पाकिस्तानने झटक्यावर झटके दिले. स्मिथनंतर जोस 49, मार्नस लबुशेन 16, ग्लेन मॅक्सवेल 0, आरोन हार्डी 10 आणि सीन एबॉट 13 धावांवर बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 8 बाद 185 अशी झाली. सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. मात्र कॅप्टन पॅट कमिन्स याने मिचेल स्टार्क याच्यासोबत 19 धावांची नाबाद भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. पॅटने 31 बॉलमध्ये 4 फोरसह नॉट आऊट 32 रन्स केल्या. तर मिचेल स्टार्क 2 धावांवर नाबाद परतला. पाकिस्तानकडून हरीस रऊफ याने 3 विकेट्स घेतल्या. शाहीन अफ्रिदीने दोघांना बाद केलं. तर नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तानची बॅटिंग
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र पाकिस्तानला 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानच्या अनेक फलंदाजांना ठिकठाक सुरुवात मिळाली, मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. पाकिस्तानकडून कॅप्टन मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक 44 धावांचं योगदान दिलं. नसीम शाह याने 40 धावा केल्या. तर बाबर आझमने 37 रन्स केल्या. तर इतरांना 25 पेक्षा अधिक पुढे जाता आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने 3 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि एडम झॅम्पा या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सीन एबोट आणि मार्नस लबुशेन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
A thrilling start to the ODI series sees Australia emerge victorious in a nail-biting contest against Pakistan 😯#AUSvPAK: https://t.co/kxMj5UZEiG pic.twitter.com/naTy5ajGeR
— ICC (@ICC) November 4, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क आणि ॲडम झम्पा.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन.