AUS vs PAK : बाबर आझमने पराभवाचं खापर सरळ ‘या’ खेळाडूवर फोडलं, गोलंदाजांनी कमबॅक केलं पण..
AUS vs PAK : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला सलग दुसरा पराभव झाला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. एक चूक किती महागात पडू शकते याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. बाबर आझम यानेही याबाबत संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा म्हंटलं सर्वच स्तरावर चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. नुसतं फलंदाजी किंवा गोलंदाजीवर अवलंबून रहाणं महागात पडू शकतं. क्षेत्ररक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा क्षेत्ररक्षणाकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण पाकिस्तान संघाकडून घ्यावं लागेल. गोलंदाजीत एक नंबर असा दावा करणारा पाकिस्तान संघ एकदम मेटाकुटीला आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना 62 धावांनी गमवल्याने मोठा फटका बसला आहे. गुणतालिकेत थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वरचष्मा असता पण एक चूक चांगलीच महागात पडली असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही याबाबत कबुली दिली आहे. सामन्यानंतर बाबर आझम याने झेल किती महागात पडला याबाबत सांगितलं आहे.
काय म्हणाला बाबर आझम?
“आमची आजची कामगिरी निराशाजनक राहिली. वॉर्नरसारख्या खेळाडूचा कॅच सोडला तर तो तुम्हाला सोडणार नाही. हे स्कोअरिंग ग्राउंड होतं याचा अंदाज होता. पण धावसंख्या खूपच असल्याने गाठणं शक्य झालं नाही. सामन्यात आम्ही शेवटच्या षटकांमध्ये कमबॅक केलं. याचं संपूर्ण श्रेय वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना जातं. पण धावांचा पाठलाग करताना मोठी भागीदारी करता आली नाही. “, असं बाबर आझम याने सांगितलं.
डेविड वॉर्नर 124 चेंडूत 14 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 163 धावा केल्या. खरं तर डेविड वॉर्नर अवघ्या 10 धावांवर बाद झाला असता. पण शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर उसामा मीरने सोपा झेल सोडला. हा झेल खूपच महागात पडला. डेविड वॉर्नरने तर पाकिस्तानी गोलंदाजीचं नंतर पिसं काढली. उसामा मीर याला शादाब खानच्या जागेवर संघात स्थान देण्यात आलं होतं.
View this post on Instagram
पाकिस्तानने पहिल्याच चेंडूवर रिव्ह्यू घालवला. वॉर्नर पायचीत असल्याची अपील केली होती. पण बॉल बॅटला लागल्याचं स्पष्ट झालं आणि रिव्ह्यू वाया गेला. त्यानंतर एक विकेट घेण्यासाठी पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या गड्यासाठी 259 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, पाकिस्तानची उपांत्य फेरीची वाट आणखी बिकट झाली आहे.