Video : झूमss झूमss झूम जरा….! कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हसन अलीच्या ठेक्यावर ऑस्ट्रेलियन प्रेक्षक थिरकले
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवशी हा सामना रंजक वळणावर आला आहे. पाकिस्तानलाही जिंकण्याी संधी आहे. असं असताना हसन अलीचा डान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे. मालिकेत कमबॅक करण्यासाठी पाकिस्तानला हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. अन्यथा मालिका गमवण्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फटका बसणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 318 धावांवर रोखलं. त्या बदल्यात पाकिस्ताननं पहिल्या डावात सर्वबाद 265 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 54 धावांची आघाडी होती. या धावसंख्ये पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी 6 गडी बाद 187 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 241 धावा आहेत. आस्ट्रेलियाला 300 च्या आत रोखण्याची पाकिस्तानकडे संधी आहे. असं सर्व विजयाचं गणित असताना हसन अलीची चर्चा रंगली आहे. त्याने आपल्या डान्स स्टेप्सवर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना थिरकवलं. प्रेक्षकांनीही त्याला उत्तम साथ दिली. त्याला जसं हवं तसंच करत गेले. त्यामुळे मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला.
दुसऱ्या डावाच्या 53 वं षटक आमेर जमालकडे सोपवलं होतं. ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 170 अशी होती. तर कॅरे स्ट्राईकला होता. तर स्मिथला अर्धशतकासाठी एका धावेची आवश्यकता होती. असं सर्व चित्र असताना सीमारेषेवर हसन अली फिल्डिंग करत होता. यावेळी प्रेक्षक त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. मग काय तो जसं करायचं अगदी हुबेहूब प्रेक्षक तसंच करत होते. पहिल्यांदा हात वर करून इकडे तिकडे फिरवले. त्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला एक हात वर करून उड्या मारल्या.
Get your body moving with Hasan Ali! #AUSvPAK pic.twitter.com/8Y0ltpInXx
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच काही जणांनी व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहे.
हसन अलीने पहिल्या डावात 23.5 षटकं टाकली. त्यात 7 निर्धाव षटकं टाकत 61 धावा दिल्या. तसेच दोन गडी बाद करण्यात यश मिळवलं. तर दुसऱ्या डावात हसन अलीने 12 षटकं टाकून 31 धावा दिल्या मात्र विकेट घेण्यास यश आलं नाही. चौथ्या दिवशी त्याच्याकडून संघाला अपेक्षा आहेत.