AUS vs WI : दुसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिज बॅकफूटवर, तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास पक्का
पहिल्या कसोटीवर ऑस्ट्लेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच कसोटीचा निकाल लागणार हे स्पष्ट झालं आहे. अवघ्या 73 धावांवर 6 गडी तंबूत गेल्याने आता पुढचा प्रवास वेस्ट इंडिजसाठी कठीण आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. एशेज सीरिजमध्ये इंग्लंडच्या भूमीवर कमाल करत मालिका बरोबरीत सोडवली. त्यानंतर बॉक्सिंग टेस्टमध्ये पाकिस्तानला नमवत व्हाईट वॉश दिला. आता वेस्ट इंडिजला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज झाला आहे. कारण सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिज संघ बॅकफूटवर गेला आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने सर्वबाद 188 धावा केल्या. त्या बदल्यात ऑस्ट्रेलियन संघाने सर्वबाद 283 धावा केल्या आणि 95 धावांची आघाडी घेतली. पण ही आघाडी मोडून काढताना वेस्ट इंडिजचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला आहे. अवघ्या 73 धावांवर 6 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच सामन्याच्या निकाल लागेल हे स्पष्ट झालं आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात झटपट गडी बाद झाले तर निकाल अवघ्या काही तासात लागेल.
दुसऱ्या डावात किर्क मॅकेन्झी आणि जस्टीन ग्रीव्ह्स सोडला तर एकही फलंदाज मनासारखी कामगिरी करू शकला नाही. या दोघांनी त्यातल्या त्यात बऱ्या धावा केल्या. मॅकेन्झीने 26, तर जस्टीन ग्रीव्ह्सने 24 धावांची खेळी केली. तर क्रेग ब्रेथवेट 1, टॅगनरीन चंद्रपॉलने 0, एलिक अथान्झेने 0, कवेम होडगेने 3 धावा करत तंबूत परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जोशुआ दा सिल्वा 17 धावांवर खेळत होता. आता तळाचे फलंदाज कसे झुंज देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने भेदक गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर कॅमरोन ग्रीन आणि नाथन लायन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विजय मिळवला तर त्याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित आणखी पक्क होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ आघाडीवर आहे. या वर्षाच्या शेवटी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत 5 सामन्याची कसोटी मालिका असेल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीवर पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून ऑस्ट्रेलियाने भुतकाळात दाखवून दिलं आहे.