ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतून अनुभवी खेळाडू ‘आऊट’, टीमला झटका
Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुखापतीमुळे दुसरी विकेट घेतली आहे. स्टार ऑलराउंडर खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. पाकिस्तानकडे स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. त्यामुळे टीम इंडिया आपले सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. अशात या स्पर्धेतून दुसरा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. खेळाडू बाहेर झाल्याने टीमसाठी हा मोठा झटका आहे. तसेच या खेळाडूच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्खिया याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मिचेल मार्श हा या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. आयसीसीने सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचा टी 20i कॅप्टन आणि बॅटिंग ऑलराउंडर आहे. एक ऑलराउंडर हा 2 खेळांडूच्या तोडीचा असतो. मिचेल बाहेर झाल्याने ऑस्ट्रेलियासाठी हा तगडा झटका समजला जात आहे.
निवड समिती आणि ऑस्ट्रेलिया मेन्स वैद्यकीय पथकाने मिचेल मार्श याला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर केलं आहे. मिचेल मार्श रिहॅबनंतरही पूर्णपणे फिट होऊ शकत नाही, त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर करण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून देण्यात आली आहे.
“मिचेलला पाठीच्या खालील भागात त्रास वाढला. त्यामुळे मिचेलला अनेक दिवस रिहॅब करावा लागेल, असं ठरवण्यात आलं. आता मार्श कमबॅकच्या हिशोबाने काही वेळ आराम आणि मग रिहॅब (दुखापतीतून सावरण्यासाठी आवश्यक ते उपचार आणि सराव) करेल “, असंही ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून स्पष्ट करण्यात आलं.
मिचेल मार्श ‘आऊट’
A big loss for Australia ahead of the ICC Men’s #ChampionsTrophy 2025 with their star all-rounder sidelined 👀
Details 👇
— ICC (@ICC) January 31, 2025
दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला बी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियासह बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या 4 संघाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 22 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. ऑस्ट्रेलिया त्यानंतर 25 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका आणि 28 फेब्रुवारीला अफगाणिस्तानविरुद्ध भिडणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झॅम्पा.