मुंबई | इंग्लंड क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननंतर आता वेस्ट इंडिज टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाने विंडिजवर पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवत विजय सुरुवात केली. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 25 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे.
कसोटी सामन्याच्या काही तासांआधी स्टार बॅट्समनला कोरोनाची लागण झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे या खेळाडूला कोरोना होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे या खेळाडूला सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज ट्रेव्हिस हेड याला कोरोनाने दुसऱ्यांदा घेरलंय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमचं टेन्शन वाढलंय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा एडलेडमध्ये पार पडला. हेड याची एडलेड सामन्यानंतर प्रकृती बिघडली. त्यानंतर हेडची चाचणी करण्यात आली. त्यानंतर हेड दुसऱ्यांदा कोरोनाच्या कचाट्यात अडकल्याचं स्पष्ट झालं. हेडला याआधी 2021 मध्ये 31 डिसेंबर रोजी कोव्हिड झाला होता.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेव्हिस हेड आता कोरोनातून पूर्णपणे बरं होण्यासाठी नियमावलीचं पालन करणार आहे. ऑस्ट्रेलिया मंगळवारी 23 जानेवारी रोजी सराव करणार आहे. मात्र हेड या सराव सत्रात सहभागी होणार नाही. दरम्यान हेडने विंडिज विरुद्ध एडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याच्या या या कामगिरीसाठी हेडला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, मॅट रेनशॉ आणि स्कॉट बोलँड.
वेस्ट इंडिज टीम | क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), टॅगेनारिन चंदरपॉल, कर्क मॅकेन्झी, अॅलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, केमार रोच, शामर जोसेफ, अकीम जॉर्डन, टेविन इम्लाच, केविन इमलाच आणि केव्हिन मॅककास्की.