New Zealand टीमला पराभवानंतर आणखी एक झटका, सेमी फायनलआधी वाईट बातमी
New Zealand Cricket Team | सलग 4 सामने जिंकून धमाकेदार सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने निर्णायक आणि महत्त्वाच्या क्षणी आपला ट्रॅक गमावला. न्यूझीलंडने त्यानंतर सलग 4 सामने गमावले.
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी 2 सामने पार पडले. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. तर दुसरा सामना हा इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. पाकिस्तानने ‘करो या मरो’ स्थितीत न्यूझीलंडवर 21 धावांनी डीएलएसनुसार विजय मिळवला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर न्यूझीलंडने पराभवाचा चौकार लगावला. न्यूझीलंडला पराभवामुळे वर्ल्ड कप सेमी फायनल मोहिम आता आणखी अवघड झाली आहे. न्यूझीलंड सलग चौथ्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत नाही, तोवर आणखी झटका लागला. नक्की काय झालं ते समजून घेऊयात.
डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 33 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा विजय ठरला. ऑस्ट्रेलिया अशा पद्धतीने सेमी फायनलच्या दिशेने आणखी पुढे गेलीय. तर इंग्लंड वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. तर पाकिस्तानच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे सेमी फायनलमध्ये आता 4 पैकी 2 जागा बूक झाल्यात. तर 2 जागा रिकामी आहेत. न्यूझीलंडसाठी सेमी फायनलचं समीकरण बिघडलेलं असताना इथे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केलं. ऑस्ट्रेलिया या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडला पछाडत तिसऱ्या स्थानी पोहचली. त्यामुळे न्यूझीलंडची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.
न्यूझीलंडसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघाचे पॉइंट्स हे 8 आहेत. मात्र न्यूझीलंडचा नेट रन रेट हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या तुलनेत बरा असल्याने ते चौथ्या ठिकाणी आहे. मात्र ऑस्ट्रेलिया विजयी झाल्याने न्यूझीलंडच निश्चित एका स्थानचं नुकसान झालंय.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
न्यूझीलंडचा वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा प्रवास
दरम्यान न्यूझीलंडने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 9 पैकी 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी पहिल्या 4 सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडने अनुक्रमे इंग्लंड, नेदरलँड्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तानवर मात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने पराभूत केल्यानंतर न्यूझीलंड विजयी ट्रॅकवरुन घसरली. न्यूझीलंडने टीम इंडियानंतर सलग 3 सामने गमावले. न्यझीलंडला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर पाकिस्तानने पराभूत केलं. न्यूझीलंड वर्ल्ड कप मोहिमेतील अखेरचा सामना हा 9 नोव्हेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे.