IND vs AUS: इंडिया-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजआधी कॅप्टनचा मोठा निर्णय
India vs Australia: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.त्याआधी कॅप्टनने मोठा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काही महिन्यांनी नोव्हेंबरमध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.उभयसंघात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही प्रतिष्ठेची मालिका खेळवण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच या मालिकेत 5 सामने खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीचा भाग असणार आहे.त्यामुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांसाठी हा मालिका फार महत्त्वाची असणार आहे. या मालिकेला अजून बराच वेळ आहे. मात्र त्याआधी कॅप्टनने मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स याने या मालिकेआधी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय केला आहे. पॅटचं या निमित्ताने 3 वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत कमबॅक होणार आहे.
पॅट कमिन्स शेफील्ड शील्ड स्पर्धेत खेळणार आहेत. पॅटचा या स्पर्धेत खेळल्याने टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जोरदार सराव होईल. पॅट कमिन्स नुकताच अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीग स्पर्धेत खेळून आला आहे. पॅटला स्कॉटलँड आणि इंग्लंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. पॅट अखेरीस 2021 साली शेफील्ड शील्ड ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला होता. ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहेत. तिथे ऑस्ट्रेलिया श्रीलंके विरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्धचे 5 आणि श्रीलंके विरुद्धचे 2 असे एकूण 7 सामने हे कांगारुंसाठी डब्ल्यूटीसी फायनल पर्यंतचा प्रवास निश्चित करतील.
इंग्लंड दौऱ्याला न जाण्याचा निर्णय
पॅट कमिन्स याने याआधीच इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्याकडे बॉलिंगसाठी 6-8 आठवड्यांचा वेळ असेल. मी दररोज जीममध्ये जाईन. तिथे मी धावण्याचा सराव करेन आणि कसून सराव करेन, असं पॅटने आधीच सांगितलं होतं. न्यू साऊथ वेल्स विरुद्ध विक्टोरिया यांच्यात 20 ऑक्टोबरला सामान होणार आहे. त्यानंतर न्यू साऊथ वेल्स विरुद्ध क्वीसलँड असा सामना रंगणार आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.ऑस्ट्रेलियाने 2023-2025 साखळीत आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. कांगारुंना 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना हा बरोबरीत सुटला आहे. तर टीम इंडिया या रँकिंगमध्ये नंबर 1 आहे.