Retirement : टी 20 वर्ल्ड कपमधील भारत-ऑस्ट्रेलिया सामना ठरला शेवटचा, दिग्गज खेळाडू BGT आधी निवृत्त
International Cricket Retirement : टीमसाठी 13 वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूने एकाएकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे टीमला मोठा धक्का बसला आहे.
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदाच 5 सामने खेळणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वेडने याआधी 8 महिन्यांआधी कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. वेडला निवृत्त होताच आता मोठी जबाबदारी मिळाली आहे. वेडची ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेड मायदेशात पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी 20i मालिकेपासून प्रशिक्षकपदाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.
मॅथ्यू वेडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मॅथ्यू वेड याने 2011 साली पदार्पण केलं होतं. तर वेडने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा या वर्षी जूनमध्ये खेळला होता. टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. टीम इंडियाने हा सामना 24 धावांनी जिंकला होता. वेडच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हाच सामना शेवटचा ठरला. मॅथ्यूने 13 वर्ष ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. वेडने या 13 वर्षांच्या कारकीर्दीतील 92 टी 20i सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 1 हजार 202 धावा केल्या. तर 97 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतकांसह 1 हजार 867 धावा केल्या. तर टेस्ट क्रिकेटमध्ये 36 मॅचमध्ये 1 हजार 613 रन्स केल्या.
आता देणार क्रिकेटचे धडे
वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी देशांतर्गत वनडे-टी20, बीबीएल आणि फ्रँचायजी क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच वेड आता प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत असणार आहे. पाकिस्तान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. वेड या टी 20i मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपिंग आणि फिल्डिंग कोच असणार आहे. उभयसंघात 4 नोव्हेंबरपासून वनडे तर 14 नोव्हेंबरपासून टी 20i मालिकेला सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने 2021 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता करण्यात मॅथ्यू वेडचं फार मोठं योगदान होतं. वेडनने पाकिस्तान विरूद्धच्या उपांत्य फेरीत 17 चेंडूमध्ये नाबाद 41 धावांची निर्णायक खेळी करत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहचवलं होतं. तसेच वेडने 2022 आणि 2024 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपर म्हणून भूमिका बजावली. मात्र त्यानंतर वेडला इंग्लंड दौऱ्यासाठी वगळण्यात आलं होतं.
मॅथ्यू वेड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
36 Test matches. 97 ODIs. 92 T20 Internationals.
Congratulations to Matthew Wade on an outstanding international cricket career! pic.twitter.com/SDWl1OhqZC
— Cricket Australia (@CricketAus) October 29, 2024
मॅथ्यू वेड काय म्हणाला?
“गेल्या टी 20 वर्ल्ड कपनंतर माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्याचं मला माहित होतं. माझं गेल्या 6 महिन्यांपासून जॉर्ज बेली आणि अँड्रयू मॅकडॉनाल्ड यांच्यासह आंतरराष्ट्रीय निवृत्ती आणि कोचिंगबद्दल चर्चा सुरु आहे. माझ्यासाठी गेल्या काही वर्षात कोचिंग ही प्राथमिकता राहिली आहे आणि मला त्यात संधी मिळाली आहे. त्यासाठी मी आभारी आणि उत्साहित आहे. माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपलीय. मी माझ्या सहकारी, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांचा आभारी आहे”,असं वेडने म्हटलं.