Cricket Retirement | वर्ल्ड कप दरम्यान कर्णधाराची तडकाफडकी निवृत्ती
Cricket Retirement | दिग्गज कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहतेही शॉक झाले आहेत. जाणून घ्या सर्वकाही.
मुंबई | वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी टीम कोण, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. वर्ल्ड कपमध्ये 9 नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानलाही सेमी फायनलची संधी आहे. सेमी फायनलसाठी 3 संघांमध्ये रस्सीखेच असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज कर्णधाराने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमची कॅप्टन मेग लेनिंग हीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. मेगने 13 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीनंतर आता थांबायचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्टरीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मेगने म्हटलं. मेगने ऑस्ट्रेलियाला आपल्या नेतृत्वात अनेक आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. तिने बरीच वर्ष ऑस्ट्रेलियाचं नेतृत्वही केलं. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी मेग आहे.
मेगने ऑस्ट्रेलियाचं 241 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. त्यापैकी 182 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व अर्थात कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. मेगने या दरम्यान ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मेगने आपल्या कारकीर्दीतील एकूण 7 वर्ल्ड कप जिंकले आहेत. यामध्ये 5 टी 20 आणि 2 वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीचा समावेश आहे. तसेच मेगने 7 पैकी 5 वर्ल्ड कप हे आपल्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलियाला जिंकून दिले आहेत. मेगने गेल्या वर्षी 6 महिन्यांचा ब्रेक घेतला होता. मेग वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड, आयर्लंड आणि विंडिज विरुद्धच्या मालिकांमध्ये खेळू शकली नाही.
मेगची पहिली प्रतिक्रिया
“क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेणं आव्हानात्मक होता, पण मला वाटतं की हीच ती वेळ होती. मी माझ्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीची मजा घेतली. मी स्वत:ला भाग्यवान समजते. तसेच आता माझ्यासाठी आता नवं काही करण्याची ही वेळ आहे. टीमच्या यशस्वी कामगिरीमुळे तुम्ही खेळता. मी आतापर्यंत जे काही केलंय त्याबाबत मला गर्व आहे. सहकाऱ्यांसोबत घालवलेले क्षण मनात कायम रुंजी राहितील”, असं म्हणत मेगने आपल्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली. तसेच असंख्य आठवणींना उजाळा दिला.
मेगची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
मेगने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. मेगने सर्वाधिक टी 20 त्यानंतर वनडे आणि सर्वात कमी कसोटी सामने खेळले. मेगने 132 टी 20, 103 वनडे आणि 6 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. मेगने या एकूण 241 सामन्यांमध्ये 17 शतकांच्या मदतीने 8 हजार 352 धावा केल्या.
नवीन कॅप्टन कोण?
दरम्यान मेगने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने आता ऑस्ट्रेलियाची धुरा कोणाकडे जाणार? असा प्रश्न या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. ऑस्ट्रेलिया महिला मंडळ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे.त्याआधी नव्या कर्णधाराची घोषणा अपेक्षित आहे. त्यामुळे मेगनंतर कुणाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.