लाहोर: मागच्या अनेक वर्षांपासूनची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. एका मोठ्या परदेशी क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करावा, अशी पीसीबीसह, पाकिस्तानी क्रिकेटपटू, चाहत्यांची इच्छा होती. कारण इंग्लंड, (England) ऑस्ट्रेलियासारखे (Australia) संघ पाकिस्तान दौऱ्यावर आले, तर क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशांच्या मनात पाकिस्तानबद्दल एक विश्वासाची भावना निर्माण होईल. पाकिस्तान आता धोकादायक देश राहिलेला नाही, हा संदेश जाईल. त्यासाठी पीसीबीसह तमाम पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी ऑस्ट्रेलियन संघाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात होते. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानचा दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियन संघ सहा आठवडे पाकिस्तानात वास्तव्य करणार आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या संघावर झाला होता गोळीबार
2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला
झाला होता. श्रीलंकन क्रिकेटपटूंच्या बसवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर क्रिकेट जगतातील प्रमुख संघांनी पाकिस्तानकडे पाठ फिरवली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक आश्वासने दिली. पण कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आता ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात आला आहे. पाचवर्षांपूर्वी लाहोर चर्चमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. पाकिस्तानात सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे ऑस्ट्रेलियन संघाने इतकी वर्ष पाकिस्तानचा दौरा केला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात शेवटचा 1998 साली खेळला होता. त्यावेळी त्यांनी तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती.
Arrived in ?? pic.twitter.com/pnis0ckFeO
— Steve Smith (@stevesmith49) February 27, 2022
अचानक दोन देशांनी रद्द केला दौरा
ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने टीम पाकिस्तान पोहोचल्याचे फोटो टि्वटरवर पोस्ट केले आहेत. पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघ तीन कसोटी, तीन वनडे आणि एक टी 20 सामना खेळणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचे सामने तटस्थ ठिकाणी म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले आहेत. मागच्यावर्षी न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ पाकिस्तानचा दौरा करणार होते. पाकिस्तानने दोन्ही देशांना कडेकोट सुरक्षा बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन दिले होते. पण सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. इंग्लंडच्या संघाने त्यांचा दौरा पुढे ढकलला.
Australian cricket team arrive in Pakistan for first tour in 24 years