“आता वेळ आली आहे…”, वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या आठवणींसह या खेळाडूने सांगितलं रिटायरमेंटबाबत
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या कटू आठवणी कोणीही विसरू शकत नाही. भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न गमवता मजल मारली होती. पण शेवटच्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तसेच जेतेपदाच्या अपेक्षा भंग पावल्या. असं असताना या सामन्यातील एका खेळाडूने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली आहे.
भारताने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेची उणीव टी20 वर्ल्डकप जिंकून भरून काढली आहे. मात्र अजूनही वनडे वर्ल्डकप स्पर्धेची जखम भलभलती आहे. आता ही कसर भरून काढण्यासाठी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची तयारी करत आहे. असं असताना श्रीलंकेत भारतीय संघाला धक्का बसला आहे. वनडे मालिका 2-0 ने गमवावी लागली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला खूपच तयारी करावी लागणार, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची तयारीही करायची आहे. बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका आहे. या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेवर भारतीय संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूंने सोशल मीडियावर एक निर्णय जाहीर केला. हा निर्णय घेताना त्याने भावुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचा उल्लेख आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून भारताला पराभूत केलं होतं. या विजयात ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मार्नस लाबुशेन शेवटपर्यंत तग धरून होता. त्याने 110 चेंडूत 58 धावांची खेळी केली होती. तसेच ट्रेव्हिस हेडसोबत 192 धावांची भागीदारी करत भारताला पराभवाच्या दरीत ढकललं. याच भागीदारीमुळे भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता लाबुशेन या सामन्यात ज्या बॅटने खेळला होता, ती बॅट रिटायर करण्याचा विचार करत आहे. सोशल मीडियावर त्याने बॅटचे दोन फोटो टाकले आहेत. यात बॅट एकदमच खराब झाल्याचं दिसत आहे. लाबुशेनने या फोटोवर पोस्ट लिहिली आहे की, ‘आता असं वाटतंय की, वर्ल्डकप अंतिम सामन्याची बॅट रिटायर करण्याची वेळ आली आहे.’ यासोबत त्याने एक रडणारा इमोजी शेअर केला आहे. यावरून त्याला किती दु:ख झालं हे अधोरेखित होतं. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Think it’s finally time to retire the World Cup final bat 🥲 pic.twitter.com/X7123Vt8vT
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) August 12, 2024
मार्नस लाबुशेनला वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात एक जीवदान मिळालं होतं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर लाबुशेन पायचीत झाला होता. त्यासाठी जोरदार अपील करण्यात आलं. पण ऑस्ट्रेलियासाठी लकी असलेला पंच रिचर्ड कॅटलबोरो यांनी त्याला नाबाद दिलं. त्यामुळे टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला आणि त्यात चेंडू स्टंपला हलकासा घासून जात असल्याचं दिसलं. पण अंपायर्स कॉलमुळे लाबुशेनला जीवदान मिळालं होतं.