Asia Cup 2023 : आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर बाबर आझम भडकला, ‘या’ चुका भोवल्याचं स्पष्टपणे सांगितलं
Asia Cup 2023, SL vs PAK : आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली. पराभवानंतर कर्णधार बाबर आझम याने संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : आशिया स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार असलेल्या पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. एकदम तगडी बॅटिंग ऑर्डर आणि गोलंदाजीत भक्कम असलेल्या पाकिस्तानचा अहंकार श्रीलंकेने मोडून काढला आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाचा अंदाज असल्याने असा निर्णय घेतल्याचं बाबर आझमने त्यावेळी सांगितलं होतं. पण हा निर्णय श्रीलंकेने फोल ठरवला. तसेच पावसाची मेहरबानी झाल्याने पाकिस्तान स्वप्नही धुळीस मिळालं. पाकिस्ताननं 42 षटकात 252 धावा केल्या आणि विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेनं हे आव्हान शेवटच्या चेंडूवर 2 गडी राखून पूर्ण केलं. तसेच मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने संताप व्यक्त केला.
काय म्हणाला बाबर आझम?
“सर्वात शेवटी आम्ही आमच्या सर्वोत्तम बॉलर्सकडून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सेकंट लास्ट ओव्हर शाहीनला दिली. त्यानंतर शेवटचं षटक झमान खान याला टाकायला दिलं. श्रीलंका खरंच खूप चांगली खेळली. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमी पडलो हे खरं आहे. त्यामुळेच आमचा पराभव झाला. मधल्या षटकात आमची गोलंदाजी सुमार ठरली. मेंडीस आणि समाराविक्रमाची पार्टनरशीप आम्हाला महागात पडली. आम्ही सुरुवात चांगली केली आणि शेवटही चांगला झाला. पण मधल्या टप्प्यात आम्ही विकेट घेऊ शकलो नाहीत.”, असं बाबर आझम याने सांगितलं.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीला शफीक आणि फखर झमान जोडी मैदानात उतरली. पण संघाच्या अवघ्या 9 धावा असताना फखर बाद झाला. त्यानंतर शफिक आणि बाबरने चांगली भागीदारी केली. पण बाबर हा दुनिथ वेल्लालगेच्या गोलंदाजीवर स्टंपिंग झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवाने मोर्चा सांभाळला. शफिक 52 धावा करून आऊट झाल्यानंतरही धावा करत राहील. त्याने नाबाद 86 धावा केल्या. तर इफ्तिखार अहमदने 47 धावांची खेळी केली.
श्रीलंकेकडून कुसल मेंडिस, सदीरा समाराविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी चांगली खेळी केली. या तिघांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा उत्तम सामना केला. कुसल मेंडिस 91 धावा करून बाद झाला. त्यानंतर चरिथ असलंका याने मोर्चा सांभाळला.नाबाद 49 धावांची खेळी केली आणि संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत आता भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना होणार आहे.