Asia Cup : बाबर आझम याचा वन डे क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, कोहलीला टाकलं मागे!
Babar Azam Fast Century : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये धडाकेबाज शतक करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने कोहलीचा विक्रम मोडलाय.
मुंबई : आशिया कप 2023ला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने विजयाचा श्रीगणेशा केलाय. नेपाळ संघाचा 238 धावांनी पराभव केला असून आशिया कपची दमदार सुरूवात केलीये. कर्णधार बाबर आझम याची 151 धावांची शानदार खेळी आणि इफ्तिखार अहमदच्या 109 धावांच्या वादळी शतकाच्या जोरावर 342 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळच्या संघ 150 धावाही करू शकला नाही. अवघ्या 104 धावांवर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं. या विजयासह कर्णधार बाबर आझम याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
बाबर आझमचा वर्ल्ड रेकॉर्ड
बाबर आझम याने 109 चेंडूत आपलं 19 वं शतक पूर्ण केलं. पाकिस्तानकडून सर्वाधिक शतके करणारा बाबर दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानकडून सईद अन्वर याने सर्वाधिक 20 शतके केली आहेत. हा रेकॉर्ड मोडण्यापासून बाबर दोन शतके दूर आहे. बाबर आझम 131 चेंडूत 151 धावा करून बाद झाला. बाबर आझमने धडाकेबाज खेळीमध्ये 14 चौकार आणि 4 षटकार मारले.
मुलतानमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यामध्ये बाबर आझमने शतक करत मोठा विक्रम केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 19 शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. बाबरने टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला दोघांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केलाय.
वनडेमध्ये सर्वात जलद 19 शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये बाबर आझमने ही कामगिरी 102 डावांमध्ये पूर्ण केली. हाशिम आमला 104 डाव, विराट कोहली 124 डाव, डेव्हिड वॉर्नर 139 डाव आणि एबी डिव्हिलियर्सने ही कामगिरी 171 डावांमध्ये केली आहे. बाबर आझम याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 31 शतके पूर्ण झाली आहेत. यामधील वन डे मध्ये 19 शतके, कसोटी 9 शतके आणि टी-20 मध्ये 3 शतके अशी त्याने एकूण 31 शतक केली आहेत.
नेपाळ विरुद्ध पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.