Video : पाचव्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉड याने बेल्सवर केलं असं काही..! दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला बसली झळ
ॲशेस मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना इंग्लंडने आपल्या खिशात घातला आणि मालिका बरोबरीत सोडवली. पण या सामन्यात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची चर्चा होत आहेत.
मुंबई : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची ॲशेस कसोटी मालिका पार पडली. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. पाचव्या सामन्यापर्यंत ऑस्ट्रेलियाकडे 2-1 ने आघाडी होती. त्यामुळे पाचवा सामना इंग्लंडसाठी महत्त्वाचा होता आणि त्यांनी विजयश्री खेचत मालिका बरोबरीत सोडवली. असं असताना पाचव्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या कृतीची चर्चा होत आहे. या कसोटी मालिकेनंतर स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने शेवटचे दोन गडी बाद करत शेवट गोड केला. या सामन्यात स्टु्अर्ट ब्रॉड याने वापरलेला तोडगा कायम लक्षात राहणारा असेल. कारण इंग्लंडला जेव्हा खरी गरज होती तेव्हाच त्याने केलेल्या कृतीचा फायदा झाला. बेल्स इकडच्या तिकडे केल्या आणि दोन्ही वेळेस यश मिळालं.
पहिल्यांदा स्टुअर्ट ब्रॉडने बेल्स इकडची तिकडे केली तेव्हा मार्नस लाबुशेन हसत होता. पण दुसऱ्या चेंडूवर त्याला त्याची प्रचिती आली, असंच म्हणावं लागेल. ब्रॉडच्या माईंड गेममध्ये लाबुशेन पुरता फसला आणि बाद झाला. मार्क वूडच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. त्यानंतर त्याने हिच क्लुप्ती टॉड मर्फी विरोधात वापरली आणि तोही बाद झाला.
काय झालं नेमकं तेव्हा..
विकेट मिळत नसल्याने स्टुअर्ट ब्रॉड निराश दिसत होता. एकतर 50 धावा दिल्या होत्या आणि एकही विकेट मिळाली नव्हती. गोलंदाजी करताना प्रेक्षक प्रोत्साहन देत होते पण ऑस्ट्रेलियन फलंदाज मारा परतवून लावत होते. चौकार मारल्यानंतर प्रेक्षकांचा आवाज एकदम कमी होत होता. यावेळी समालोचक नासिर हुसैन तोडगा वापरण्याचा सल्ला देत होता. शेवटी ब्रॉडने आपला तोडगा वापरण्याचा निर्णय घेतला.
In 20 years’ time village cricketers searching for a wicket will still be swapping the bails over and trying to ‘do a Broad.’ If that’s not sporting immortality, I don’t know what is. Thanks for everything @StuartBroad8 ? pic.twitter.com/UoNM7U2uSt
— Jason Keen (@Jason_Keen) July 31, 2023
91 व्या षटकाचा पाचवा चेंडू टाकल्यानंतर ब्रॉडने तोडगा वापरत बेल्स इकडची तिकडे केली. शेवटच्या चेंडूवर हवं तसंच झालं आणि टॉड मर्फीच्या बॅटला चेंडू लागून थेट जॉनी बेयरस्टोच्या हाती गेला. मग काय प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. ब्रॉडची प्रेयसी मोली एलिजाबेथ किंगच्या डोळ्यात पाणी आलं. स्टुअर्ट ब्रॉडचा कसोटी मालिकेचा शेवट गोड झाला असंच म्हणावं लागेल.