ENG vs BAN : कोण म्हणतं एकटा खेळाडू मॅच जिंकवत नाही, वर्ल्ड कप विनर संघाला एकट्याने चारली धूळ!
स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने एकट्याने केलेल्या चमकदार कामगिरीने वर्ल्ड कप विजेत्या संघाला पराभवाचं सामना करावा लागला आहे.
ढाका : बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये बांगलादेश संघाने आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने एकट्याने केलेल्या चमकदार कामगिरीने वर्ल्ड कप विजेत्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शाकिबने बॅट आणि बॉलनेही आपली जादू दाखवली आणि संघाला व्हाईटवॉशचा सामना करू दिला नाही. एकट्या इंग्लडच्या संघाला शाकिब पुरून उरला. मात्र अगोदरच्या दोन सामन्यांमधील विजयाच्या जोरावर इंग्लंड संघाने मालिका 2-1 ने खिशात घातली आहे.
नाणेफेक जिंकून बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर सॅम करन याने लिटन दासला बाद केलं. तिसऱ्याच षटकात करननेच तामिम इक्बाल याला बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या शांटो आणि मुशफिकुर रहीम यांनी 90 धावांची चांगली भागीदारी केली. शांटो याने 53 धावा तर रहिमने 70 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शाकिब अल हसन याने 73 धावा करत संघाला संघाला 250 धावांच्या जवळपास मजल मारून दिली. बांगलादेशने 246 धावा केल्या.
इंग्लंडकडून फलंदाजीसाठी आलेल्या जेसन रॉय (19) आणि फिलिप सॉल्ट (35) यांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. या भागीदारीनंतर इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. ख्रिस वोक्स (34), कर्णधार जोस बटलर (26) आणि सॅम करन (23) यांनी विजय खेचण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना काही यश आलं नाही. शाकिबने सर्वाधिक 4 बळी घेतले तर त्याच्यासोबत तैजुल इस्लाम आणि इबत हुसेन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
दरम्यन, इंग्लंड संघ सामना हरला असला तरी तीन सामन्यांची मालिका जिंकण्यात त्यांना यश आले. इंग्लंडने पहिला सामना 3 गडी राखून आणि दुसरा एकदिवसीय सामना 132 धावांनी जिंकला होता.