BAN vs SA : दक्षिण आफ्रिकेकडे मालिका विजयाची संधी, बांगलादेश बरोबरी करणार?
Bangladesh vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिका बांगलादेश विरूद्धच्या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामना हा बांगलादेशसाठी 'करो या मरो' असा आहे.
टीम इंडियाला मायदेशात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी मालिका गमवावी लागली. न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने 2012 नंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. टीम इंडियानंतर आता शेजारी बांगलादेशवर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. बांगलादेश मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर दुसर्या बाजूला बांगलादेशला मायदेशात मालिका पराभव टाळायचा असेल, तर दुसऱ्या सामन्यात जिंकावं लागणार आहे. त्यामुळे बांगलादेशची मायदेशात ‘कसोटी’ पाहायला मिळणार आहे.
पहिल्या सामन्यात काय झालं होतं?
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं होतं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 10 वर्षांची प्रतिक्षा संपवली होती. दक्षिण आफ्रिकेचा हा 10 वर्षांनंतर आशिया खंडातील पहिला विजय ठरला होता.
दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानी
दरम्यान दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 47.62 इतकी आहे. दक्षिण आफ्रिकेला या साखळीत या दौऱ्यानंतर मायदेशात श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी 2-2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
दक्षिण अफ्रीका क्रिकेट टीम: एडेन मार्करम (कर्णधार), टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेविड बेडिंघम, रयान रिकेल्टन, मैथ्यू ब्रीट्जके, काइल वेरेन (विकेटकीपर), वियान मुल्डर, केशव महाराज, डेन पिड्ट, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, डेन पैटरसन, सेनुरान मुथुसामी आणि डेवाल्ड ब्रेव्हीस.
बांग्लादेश क्रिकेट टीम: महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), मुश्फिकुर रहीम, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, झाकेर अली, नईम हसन, तैजुल इस्लाम, हसन महमूद, जाकिर हसन, खालिद अहमद , हसन मुराद आणि नाहिद राणा.