BAN vs SL | सदीरा समरविक्रमा-चरिथा असलंका जोडीची अर्धशतकं, श्रीलंकेचा बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय
Bangladesh vs Sri Lanka Asia Cup 2023 | पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेने आशिया कप 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. श्रीलंकेने बांगलादेशवर विजय मिळवला आहे.
कोलंबो | श्रीलंकेने आशिया कप 2023 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. श्रीलंका क्रिकेट टीमने बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 39 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बांगलादेश पराभूत झाली असली तरी त्यांच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला सुरुवातीला झटपट झटके दिले. तसेच बांगलादेशने श्रीलंकेला सहजासहजी जिंकून दिलं नाही, त्यासाठी चांगलंच झुंजवलं. 165 धावांसाठी श्रीलंकेला 39 ओव्हरपर्यंत खेळायला भाग पाडलं.
श्रीलंकेने 43 धावांच्या मोबदल्यात पहिले 3 विकेट्स गमावले. दिमुथ करुणारत्ने याने 1, पाथुम निशांका याने 14 आणि कुसल मेंडिल 5 धावांवर आऊट झाले. मात्र त्यानंतर सदीरा समरविक्रमा आणि चरिथा असलंका या दोघांनी विजयाचा पाया रचला आणि श्रीलंकेचा विजय निश्चित केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. या दरम्यान सदीराने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र श्रीलंकेचा स्कोअर 121 असताना सदीरा 54 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आलेला धनंजया डी सीलव्हा स्वस्तात माघारी परतला. धनंजया याने 2 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन दासुन शनाका आणि चरिथा असलंका या दोघांनी श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं.
श्रीलंकेची विजयी सुरुवात
Sri Lanka celebrates a victorious start to the group stage with a comfortable 5-wicket win! 🙌#AsiaCup2023 #SLvBAN pic.twitter.com/gAmg41kql6
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 31, 2023
अखेर बदला घेतला
दासून शनाका याने नाबाद 14 धावांची खेळी केली. चरिथा असलंका याने 92 बॉलमध्ये 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. चरिथा खऱ्या अर्थाने श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. तसेच बांगलादेशकडून कॅप्टन शाकिब अल हसन याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि मेहदी हसन या तिघांनी 1-1 विकेट घेतली. श्रीलंकेने या विजयासह 10 वर्षांपूर्वीचा बदला घेतला. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका 2013 साली याच स्टेडियमवर आमनेसामने होते. तेव्हा बांगलादेशने श्रीलंकेचा 3 विकेट्सने पराभव केला होता.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.