Asia Cup 2023 | आशिया कपआधी टीमला मिळणार नवा कॅप्टन, ‘या’ खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी!
Asia Cup 2023 Captaincy | आशिया कप स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीमला नवा कॅप्टन मिळणार आहे.
मुंबई | बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आशिया कपचं आयोजन हे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये करण्यात आलंय. स्पर्धेतील एकूण 13 सामन्यांपैकी 4 पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. टीम इंडिया आपले सर्व सामने हे श्रीलंकेत खेळणार आहेत. या आशिया कपआधी टीमच्या कर्णधारपदी पुन्हा स्टार खेळाडूची नियुक्ती केली जाऊ शकते.
बांगलादेश क्रिकेट टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही पुन्हा ऑलराउंडर शाकिब अल हसन याला दिली जाऊ शकते. बांगलादेशचा कॅप्टन आणि अनुभवी फलंदाज तमीम इक्बाल याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तसेच दुखापतीमुळे आशिया कपमध्ये सहभागी होणार नसल्याचंही तमीमने सांगितलं होतं. त्यामुळे आता बांगलादेशच्या कर्णधारपदी दुसरा खेळाडू विराजमान होणार, हे निश्चित आहे.
कर्णधारपदासाठी शाकिब अल हसन याचं नाव आघाडीवर आहे. शाकिब बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर चोख कामगिरी करतो. तसेच त्याला कॅप्टन्सीचा अनुभवही आहे. त्यामुळे शाकिबला कॅप्टन्सीची सूत्रं मिळण्याची तीव्र शक्यता आहे.
तमीमने पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून माघार घेतली. तमीमने काही दिवसांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. मात्र बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना-तमीम इक्बाल यांची भेट झाली. तमीमने या भेटीनंतर निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
“आम्ही आतापर्यंत कॅप्टन्सीबाबत चर्चा केलेली नाही. आम्हाला याबाबत विचारविनिमय करावा लागेल. आशिया कपऐवजी एखादी मालिका असती,तर आम्ही लिटॉन दास याला कर्णधार केलं असतं. मात्र आता आम्हाला भविष्याबाबतही विचार करावा लागेल”, असं बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.
“शाकिब निश्चितच कॅप्टन म्हणून पसंत आहे. मात्र शाकिब 2 वर्ष खेळेल याची खात्री आहे का? त्यामुळे याबाबत वार्तालाप करण्याची गरज आहे. मात्र शाकिब कर्णधारपदासाठी पहिली पसंत आहे”, असा पुनरोच्चारही बीसीबी अध्यक्षांनी केला.