Icc Champions Trophy 2025 साठी शेजाऱ्यांकडून टीम जाहीर, 447 सामने खेळणाऱ्याला संधी नाही
Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी आता सहभागी संघांनी खेळाडूंची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शेजारी देशाने या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि यूएईत करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. इंग्लंडने सर्वातआधी 22 डिसेंबर 2024 रोजी सर्वात आधी संघ जाहीर केला. तर आता भारताच्या शेजारी देशाने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. मात्र निवड समितीने सर्वात अनुभवी खेळाडूला संघात स्थान दिलेलं नाही. या खेळाडूला तब्बल 447 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. मात्र एका वादात त्या खेळाडूचं नाव आहे.
बांगलादेश क्रिकेट टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. नजमुल हुसैन शांतो हा बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. मात्र निवड समितीने माजी कर्णधार आणि अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन याला संधी दिली नाहीय. शाकिब अल हसन सलग दुसऱ्यांदा बॉलिंग एक्शन टेस्टमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे शाकिबची निवड करण्यात आली नाही. तर दुसऱ्या बाजूला लिटन दास याचाही समावेश करण्यात आलेला नाही. तर अनुभवी महमूदुल्लाह आणि मुशफिकुर रहीम यांचा समावेश आहे.
दरम्यान बांगलादेश टीम या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये आहे. बांगलादेशसह या ग्रुपमध्ये एकूण 3 आशियाई संघ आहे. ए ग्रुपमध्ये बांगलादेश, पाकिस्तान, टीम इंडिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.
बांगलादेश टीमची घोषणा
Bangladesh will be without the services of their ace all-rounder for #ChampionsTrophy 2025 👀
Squad details 👇https://t.co/l4jlMCl8e4
— ICC (@ICC) January 12, 2025
बांगलादेश या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारीला करणार आहे. बांगलादेशसमोर पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर बांगलादेश न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. हा सामना रावळपिंडीत 24 फेब्रुवारीला होईल. तर बांगलादेश साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध 27 फेब्रुवारीला खेळणार आहे. बांगलादेशने गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे आता बांगलादेश ए ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
बांगलादेशचं वेळापत्रक
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया, 20 फेब्रुवारी, दुबई.
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, 24 फेब्रुवारी, रावळपिंडी.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, 27 फेब्रुवारी, रावळपिंडी.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांग्लादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), सौम्या सरकार, तंजीद हसन, तॉहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, एमडी महमूद उल्लाह, जेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर, परवेझ हुसैन इमोन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब आणि नाहिद राणा.