Icc Champions Trophy 2025 : इंडिया-बांग्लादेश सामन्याआधीच दिग्गज फलंदाजाची निवृत्ती, टीमला धक्का
Cricket Retirement : टीम इंडिया आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेतील पहिला सामना 20 फेब्रुवारीला खेळणार आहेत. त्याआधी स्टार फलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार . स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आल्याने टीम इंडिया सुरक्षिततेच्या कारणामुळे सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड ए ग्रुपमध्ये आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात 20 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. मात्र त्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 40 दिवसांआधी बांगलादेश क्रिकेट टीमला धक्का लागला आहे. बांगलादेशच्या दिग्गज फलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इकबाल याने शुक्रवारी 10 जानेवारीला निवृत्ती जाहीर करत कमबॅकबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. तमीमने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात कमबॅक करत खेळावं, अशी अपेक्षा बांगलादेश क्रिकेट बोर्डाला होती. मात्र तमीमने क्रिकेट बोर्डाच्या विनंतीला केराची टोपली दाखवत निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय.
तमीमने फेसबूकवर भलीमोठी पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने तमीमला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळावं, असं आवाहन केलं होतं. तमीमने या प्रस्तावावर काही वेळ विचारही केला. मात्र अखेर तमीमने हा प्रस्ताव फेटाळला. एका रिपोर्टनुसार, तमीमने निवड समितीला बुधवारीच कळवळं होतं. मात्र त्यानंतर कर्णधार नजमुल हुसैन शांतो यानेही तमीमला निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती केली होती. मात्र तमीमने आणखी एक दिवस विचार केला आणि अखेर त्याला जे पटलं ते सोशल मीडियावरुन जाहीर केलं.
तमीमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
TAMIM IQBAL RETIRED FROM INTERNATIONAL CRICKET…!!!!
– End of an Era in Bangladesh Cricket. pic.twitter.com/XnWpc6u9V7
— Johns. (@CricCrazyJohns) January 10, 2025
तमीम इकबालची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
तमीम इकबाल बांगलादेशच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक होता. तमीमने 70 कसोटी, 243 एकदिवसीय आणि 78 टी 20i सामन्यांमध्ये बांगलादेशचं प्रतिनिधित्व केलं आहे. तमीमने कसोटीत 1 द्विशतक 10 शतकं आणि 31 अर्धशतकांसह 5 हजार 134 धावा केल्या. तसेच अनुभवी फलंदाजाने वनडेत 14 शतकं आणि 56 अर्धशतकांसह 8 हजार 357 धावा केल्या. तर तमीमच्या नावावर 78 टी 20i सामन्यांमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 1 हजार 758 धावांची नोंद आहे.