IND vs BAN: कसोटी मालिकेआधी दिग्गजाचा राजीनामा, नक्की कारण काय?
India vs Bangladesh Test Series 2024: टीम इंडिया मायदेशात बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी दिग्गजाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बांगलादेशने पाकिस्तान त्यांच्याच घरात 2-0 अशा फरकाने कसोटी मालिकेत लोळवलं. त्यामुळे बांगलादेशचा विश्वास दुणावलेला आहे. आता बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध कसोटी आणि टी 20I मालिका खेळणार आहे. मात्र या कसोटी मालिकेआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डात मोठा बदल झाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डातील महत्त्वाच्या सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या दिग्गजाने गेली 11 वर्ष बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
बांगलादेशचा माजी कर्णधार खालिद महमूद याने क्रिकेट बोर्डाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महमूद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशातील राजकीय उलथापालथीचा क्रिकेट बोर्डावरही परिणाम झाला आहे. महमूद 2013 साली संचालकपदाच्या निवडणुकीत विजयी झाले होते.
बांगलादेश क्रिकेटमधील योगदान
खालिद महमूद यांनी बांगलादेश क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे. महमूद यांनी बीसीबीच्या खेळ विकास अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. महमूद यांच्याच कार्यकाळात बांगलादेशने 2020 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. बांगलादेशने जिंकलेली ही आयसीसीची एकमेव ट्रॉफी आहे. तसेच महमूद यांनी अंतरिम हेड कोच यासह अनेक पदांची जबाबदारीही सार्थपणे पार पाडलीय.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांचं अनेक महिन्यांनी संघात पुनरागमन झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला अद्याप बांगलादेशने संघ जाहीर केलेला नाही.
खालिद अहमद यांचा राजीनामा
🚨 OFFICIAL: Khaled Mahmud Sujon resigns as director of Bangladesh Cricket Board (BCB). pic.twitter.com/zlRRGfGOCa
— Saif Ahmed (@saifahmed75) September 11, 2024
बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.