बांगलादेशच्या सुपरफॅनला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, मोहम्मद सिराजचा या प्रकरणाशी काय संबंध?

| Updated on: Sep 27, 2024 | 4:55 PM

Bangladesh ‘super fan’ Tiger Roby: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटीचा पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला. 35 षटकांचा खेळ झाला आणि पावसाने हजेरी लावली. बांगलादेशची 3 बाद 107 अशी स्थिती होती. पण या सामन्यात बांगलादेशी फॅनला झालेली मारहाण चर्चेचा विषय ठरली आहे. आता या प्रकरणात मोहम्मद सिराजच्या नावाचा संबंध जोडला जात आहे.

बांगलादेशच्या सुपरफॅनला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, मोहम्मद सिराजचा या प्रकरणाशी काय संबंध?
Follow us on

कानपूर कसोटी सामन्यात भारत आणि बांग्लादेशचे खेळाडू सामना करत आहेत. असं असताना या सामन्याव्यतिरिक्त एक प्रकरण चांगलंच गाजत आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये बांगलादेशचा जबरा फॅनला मारहाण करण्यात आली आहे. बांगलादेशच्या या चाहत्याचं नाव टायगर रोबी असं आहे. त्याने मारहाणीसाठी काही भारतीय चाहत्यांना जबाबदार धरलं आहे. मारहाणीनंतर टायगर रोबी रडताना दिसला. इतकंच काय तर पोटात जबर मार लागल्याने पोलिसांसमोरच गयावया करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला थेट रुग्णालयात दाखल केलं. बांगलादेशच्या फॅनला मारहाण करण्याचं नेमकं कारण काय? नेमकं कशासाठी टायगर रोबीला मारहाण केली गेली? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत. बांगलादेशच्या फॅनला मारहाण झाली, पण यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं नाव काही कारण नसताना घेतलं जात आहे. मोहम्मद सिराजचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. पण सोशल मीडियावर याबाबत काही दावे केले जात आहेत.

सोशल मीडियावरील दाव्यानुसार, टायगर रोबी सामन्यात विचित्र पद्धतीने वागत होता. त्यामुळे कानपूरच्या लोकांना राग अनावर झाला. इतकंच काय तर बांगलादेशचा हा फॅन मोहम्मद सिराजला शिव्या देत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मैदानातील लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली. इतकंच काय तर बांगलादेशचा हा फॅन चेन्नईमध्ये टीम इंडियाविरुद्ध घोषणाबाजी करत होता. दुसरीकडे, कानपूरमध्ये बांगलादेशी संघाचा विरोध होत आहे. बांगलादेशचा संघ कानपूरला आला तेव्हा काही संघटनांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हिंदूंवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संघटनांमध्ये रोष आहे. बांगलादेशी फॅनला झालेली मारहाण त्याच्या निगडीत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पण याबाबत ठोस असं काहीच नाही.

दरम्यान, नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बांगलादेशने पहिल्या दिवशी 3 गडी बाद 107 धावा केल्या आहे. पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला.