कोलंबो | टीम इंडियाचा सुपर 4 मधील शेवट पराभवाने झाला आहे. तर बांगलादेशने सुपर 4 मधून जाता जाता अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला झटका दिलाय. बांगलादेशने टीम इंडियावर 6 धावांनी निर्णायक विजय मिळवलाय. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचं पाठलाग करताना टॉप आणि मिडल ऑर्डरने निराशा केली. तर शुबमन गिल याने शतकी आणि अक्षर पटेल याने निर्णायक खेळी करत विजयाच्या आशा कायम राखल्या. मात्र ऐनवेळेस टीम इंडियाच्या फलंदाजांनी माती खाल्ली. बांगलादेशसमोर गुडघे टेकले. टीम इंडिया अशाप्रकारे 49.5 ओव्हर्समध्ये 259 धावांवर ऑलआऊट झाली.
टीम इंडियाची 266 धावांचा पाठलाग करताना अडखळत सुरुवात झाली. रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. तिलक वर्मा याने 5 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. केएलने चिवट बॅटिंग केली, पण फार वेळ तग धरु शकला नाही. केएल 19 धावावंर आऊट झाला. ईशान किशन याने 5 धावा केल्या. सूर्याला चांगली संधी आणि सुरुवातही मिळाली. सूर्याने 26 धावा केल्या. मात्र त्याला या खेळीच मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. जडेजा पुन्हा फ्लॉप ठरला. जड्डूने 7 धावा केल्या.
एकामागोमाग एक विकेट जात असताना शुबमन गिल याने एक बाजू लावून धरलेली. शुबमनने सातव्या विकेटसाठी अक्षर पटेल याच्यासोबत 40 धावांची भागीदारी केली. या दरम्यान शुबमनने शतक झळकावलं. या जोडीमुळे टीम इंडिया जिंकण्याची आशा कायम होती. मात्र शतकांतर दे दणादण हाणामारी करण्याच्या नादात शुबमन आपली विकेट टाकून बसला. शुबमनने सर्वाधिक 121 धावा केल्या.
शुबमननंतर सर्व मदार अक्षर पटेल याच्यावर होती. त्यानुसार तो खेळत होता. शार्दुलसोबत या दोघांनी धावफळक हलता ठेवला. मात्र मुस्तफिजुर याने शार्दुलचा अप्रतिम कॅच घेतला. शार्दुल 11 धावांवर आऊट झाला. शार्दुलनंतर अक्षर पटेल हा देखील 42 धावांवर आऊट झाला. त्यामुळे विजयाची आशाच संपली. त्यानंतर मोहम्मद शमीने 3 बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना 1 फोर ठोकला. तर दुसऱ्या बॉलवर दुसरी धाव घेताना स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. शमीने 6 धावा केल्या. तर प्रसिध झिरोवर नाबाद परतला.
बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमान याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तांझिम हसन शाकिब आणि मेहदी हसन या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशने कॅप्टन शाकिब अल हसन याच्या 80, तॉहिद हृदॉय याच्या 54 आणि नसूम अहमद याच्या 44 धावांच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 265 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकुर याने 3 आणि मोहम्मद शमी याने 2 विकेट्स घेतल्या. तर प्रसिध कृष्णा अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मु्स्तफिजुर रहीम.