BAN vs SL | बांगलादेशचा 3 विकेट्सने विजय, श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधून बाजार उठला!
Bangladesh vs Sri Lanka | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतून बांगलादेश, इंग्लंड आणि त्यानंतर श्रीलंका टीमचं पॅकअप झालंय. श्रीलंका वर्ल्ड कपमधून बाहेर पडणारी तिसरी टीम ठरली आहे.
नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 38 व्या सामन्यात बांगलादेश विजयी ठरली आहे. बांगलादेशने श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने बांगलादेशला विजयासाठी 280 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही चांगली लढत दिली मात्र अखेर बांगलादेशने बाजी मारली. बांगलादेशने 7 विकेट्स गमावून 41 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शाकिब अल हसन आणि नजमुल होसैन शांतो ही जोडी बांगलादेशच्या विजयाची हिरो ठरली.
बांगलादेशचा वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका विरुद्धचा हा पहिलाच विजय ठरला. बांगलादेशने या विजयासोबत श्रीलंकेलाही बुडवलंय. बांगलादेशच्या या विजयामुळे श्रीलंकाचा वर्ल्ड कपमधील प्रवासही इथेच संपलाय. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील रायव्हलरीमुळे हा सामना चांगलाच चर्चेत राहिला. अँजेलो याने शाकिबला आऊट करत बदला घेतला. मात्र सामना जिंकण्यात अखेर बांगलादेशलाच यश आलं.
बांगलादेशची बॅटिंग
बांगलादेशच्या विजयात कॅप्टन शाकिब अल हसन आणि नजमूल शांतो या जोडीने निर्णायक भूमिका बजावली. बांगलादेशकडून नजमूल शांतो याने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली. शाकिबने 82 रन्स केल्या. तर इतर फलंदाजांनी आवश्यक योगदान देत बांगलादेशला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली. बांगलादेशकडून शाकिब आणि नजमूल या दोघांशिवाय महमदुल्लाह याने 23 धावा केल्या. लिटॉन दास याने 22 धावांचं योगदान दिलं.
विकेटकीपर मुशफिकुर रहीम 10 रन करुन मैदानाबाहेर परतला. तांझिद हसन 9 धावांवर आऊट झाला. मेहदी हसन 3 धावा करुन बाद झाला. तर तॉहिद हृदॉय आणि तांझिम हसन साकिब या जोडीने बांगलादेशला विजय मिळवून दिला. तॉहिद हृदॉय याने नाबाद 15 आणि तांझिम हसन साकिब याने नाबाद 5 धावा केल्या. श्रीलंकाकडून दिलशान मधुशंका याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर महीश तीक्षणा आणि अँजेलो मॅथ्युज या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या.
श्रीलंकाची बॅटिंग
त्याआधी श्रीलंकाने 49.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 279 धावा केल्या. श्रीलंकाकडून चरिथ असलंका याने सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी केली. सदीरा समरविक्रमा आणि पाथमु निसांका या दोघांनी प्रत्येकी 41 धावा केल्या. धनंजया डी सिल्वा याने 34, महीश तीक्षणा याने 22 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन कुसल मेंडीस याने 19 रन्स केल्या. कुसल परेरा आणि चमिराने 4-4 धावा केल्या. तर रजिथा आणि अँजेलो मॅथ्युज दोघेही झिरोवर आऊट झाले. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिब याने 3 विकेट्स घेतल्या. शोरिफूल इस्लाम आणि कॅप्टन शाकिबने 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मेहदी हसन मिराजने 1 विकेट घेतली.
दुर्देवी अँजेलो मॅथ्युज
दरम्यान हा सामना चर्चेत आला तो अँजेलो मॅथ्युज याला आऊट दिल्याने. अँजेलो मॅथ्युज याला नियमांनुसार टाईम आऊट बाद घोषित करण्यात आलं. त्यामुळे यावरुन चांगलाच वाद रंगला आहे.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.