Bcci कडून वार्षिक कराराची घोषणा, 16 खेळाडूंची निवड, कुणाचा समावेश?
Bcci Central Contract List : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारात एकूण 16 खेळाडूंचा समावेश केला आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु असताना बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने 2024-2025 या वर्षासाठी महिला क्रिकेट टीमसाठी वार्षिक कराराची घोषणा (India Womens Cricket Annual Central Contract) केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारात एकूण 16 खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच या 16 खेळाडूंना 3 श्रेणीत विभागण्यात आलं आहे. ए, बी आणि सी अशा 3 श्रेणीत या 16 खेळाडूंना विभागलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. कोणती महिला क्रिकेटपटू कोणत्या श्रेणीत आहे? हे जाणून घेऊयात.
बीसीसीआयने ए ग्रेडमध्ये फक्त तिघांना संधी दिली आहे. बी ग्रेडमध्ये 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरित 9 खेळाडूंना सी ग्रेडमध्ये निवडण्यात आलं आहे. हा करार 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे.
कोणत्या श्रेणीत कोणते खेळाडू?
बीसीसीआयकडून कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या तिघांना ए ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे. बी श्रेणीत रेणुका ठाकुर, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष आणि शफाली वर्मा या चौघींचा समावेश आहे. तर यास्तिका भाटीया, राधा यादव, श्रेयांका पाटील, तितास साधू, अमनज्योत कौर, उमा छेत्री, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकार यांना सी ग्रेडमध्ये संधी मिळाली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
वार्षिक करार जाहीर
Details 🔽https://t.co/FRsHHLbgsz
— BCCI Women (@BCCIWomen) March 24, 2025
ए ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक 50 लाख रुपये मिळणार आहेत. बी ग्रेडमधील खेळाडूंना 30 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर सी ग्रेड खेळूडंना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. बीसीसीआयकडून महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना सामन्यासाठी समान रक्कम देते. मात्र हाच न्याय वार्षिक करारबाबत नाही. महिला आणि पुरुष खेळाडूंना वार्षिक करारानुसार मिळणाऱ्या रक्कमेत फार तफावत आहे. पुरुष क्रिकेटपटूंना ए प्लस, ए, बी आणि श्रेणी अशा 4 श्रेणीनुसार अनुक्रमे 7,5,3 आणि 1 कोटी दिले जातात. तर ए ग्रेडमधील महिला क्रिकेटपटूंना 50 लाख रुपये मिळतात.