IND vs ENG T20i Series : इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कुणाला संधी?
India vs England T20i Series 2025 : इंग्लंड भारत दौऱ्याची सुरुवात टी 20i मालिकेने करणार आहे. बीसीसीआयने या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?
टीम इंडिया नववर्षात मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात टी 20i मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहे. तर एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने पार पडणार आहे. बीसीसीआय निवड समितीने टी 20i मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघातील या टी 20i मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मुंबईत अंतिम सामना पार पडणार आहे. भारतीय संघात या मालिकेसाठी कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.
सूर्या कॅप्टन आणि अक्षरला प्रमोशन
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑलराउंडर अक्षर पटेल याला प्रमोशन मिळालं आहे. अक्षर पटेल याच्यावर विश्वास दाखवत निवड समितीने ऑलराउंडरला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता अक्षरवर बॉलिंग, बॅटिंगसह उपकर्णधार या नात्याने सूर्यकुमारला चांगली साथ देण्याची अतिरिक्त जबाबदारी आहे. अक्षर ही जबाबदारी किती चांगल्या पद्धतीने पार पाडतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मोहम्मद शमीचं कमबॅक
दरम्यान टीम इंडियात अखेर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली आहे. शमीचं टी 20i संघात 2 वर्षांनंतर पुनरागमन झालं आहे. शमीने इंग्लंडविरुद्ध 10 नोव्हेंबर 2022 रोजी अखेरचा टी 20i सामना खेळला होता. शमीला दरम्यानच्या काळात वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर दुखापतीमुळे संघापासून दूर रहावं लागलं होतं.
जॉस बटलर कॅप्टन
दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने 22 डिसेंबर 2025 रोजीच भारत दौऱ्यासाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला होता. त्यानुसार, जॉस बटलर हा भारत दौऱ्यातील दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
भारत-इंग्लंड टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.