Bcci Chief Selector | निवड समितीच्या अध्यक्षपदी ‘हा’ दिग्गज खेळाडू! बीसीसीआयचं ठरलं!
Bcci New Chief Selector | चेतन शर्मा यांनी फेब्रुवारी महिन्यात निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या पदी मराठमोळ्या खेळाडूची निवड होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई | टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदासाठी माजी वेगवान गोलंदाज मराठमोळ्या अजित आगरकर याचं नाव आघाडीवर आहे. चेतन शर्मा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. तर सध्याची निवड समिती ही अध्यक्षविनाच आहे. टीम इंडिया आता विंडिज दौऱ्यानंतर, आयर्लंड दौरा, आशिया कप आणि वर्ल्ड कप खेळणार आहे. या आशिया कप स्पर्धेआधी बीसीसीआयने रिक्त असलेल्या निवड समिती अध्यक्षपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय. या पदासाठी अर्ज करण्यासाठी 30 जून अखेरचा दिवस आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने अजित आगरकर यांच्याशी संपर्क साधला. बीसीसीआयने आगरकरला निवड समिती अध्यक्षपदासाठी वाढीव वेतन देण्याचं आश्वासन दिलंय. बीसीसीआयच्या आश्वासनानंतर आगरकर यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला. आगरकर यांनी नुकतंच आयपीएलमधील टीम दिल्ली कॅपिट्ल्सच्या असिस्टंट कोच पदाचा राजीनामा दिला.
अजीत आगरकर यांची दुसरी वेळ
अजीत आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची ही दुसरी वेळ आहे. आगरकर यांनी याआधी 2020 साली अर्ज केला होता. मात्र तेव्हा निवड समिती अध्यक्षपदाने आगरकर यांना हुलकावणी दिली होती.
निवड समितीतील सदस्यांना वेतन किती?
बीसीसीआय निवड समितीतील सदस्यांना वार्षिक 90 लाख इतका पगार मिळतो. तर मुख्य निवडकर्त्याला 1 कोटी इतकं वेतन असतं.
बीसीसीआयकडून पगारवाढीसाठी ग्रीन सिग्नल
दरम्यान बीसीसीआयने निवड समितीला देण्यात येणाऱ्या वेतनाची समिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी निवड समिती अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यात रस दाखवला नाही. त्यामुळेच बीसीसीआयने हा निर्णय घेतलाय. सध्या घडीला बीसीसीआय निवड समितीती सुब्रतो बॅनर्जी, सलिल अंकोला, श्रीधरन शरथ आणि शिव सुंदर दास यांचा समावेश आहे.
कारकीर्दीतील सुवर्ण क्षण
अजित आगरकर यांची ओळख वेगवान गोलंदाज अशी आहे. मात्र यापुढे जाऊन आगरकर यांनी मोठी कामगिरी केलीय. अजित आगरकर यांनी 2000 साली झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडियासाठी 21 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक केलं होतं. आगरकरचं हा विक्रम 23 वर्षांनंतरही कायम आहे. इतकंच नाही, तर आगरकरने लॉर्ड्सवर शतक केलंय. प्रत्येक बॅट्समनचं लॉर्ड्सवर शतक करण्याचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही.
अजित आगरकर यांची क्रिकेट कारकीर्द
अजित आगरकर याने 191 वनडे, 26 कसोटी आणि 4 टी 20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 58, 288 आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आगरकरने वनडेत 3 अर्धशतकांसह 1 हजार 269, कसोटीत 1 शतकासह 571 आणि टी 15 धावा केल्या आहेत.