मुंबई : सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात एका खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. ते म्हणजे सर्फराज खान. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा हा खेळाडू मागच्या तीन वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रदर्शन करतोय. सर्फराजने रणजी स्पर्धेत खोऱ्ंयाने धावा केल्या आहेत. मात्र, तरीही त्याच्यासाठी अजून टीम इंडियाचे दरवाजे उघडलेले नाहीत. सर्फराज खानने टीममध्ये सिलेक्शनसाठी आत काय करावं? असा प्रश्न काही माजी क्रिकेटपटुंनी विचारलाय. आगमी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट टीममध्ये सर्फराज खानची निवड झालेली नाही.
त्यावरुन भारतीय क्रिकेट वर्तुळात बरीच उलट-सुलट चर्चा आहे. मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्यावेळीही सर्फराज खानच्या नावाची चर्चा होती. पण त्याला संधी मिळाली नाही.
सर्फराजच्या क्रिकेट कौशल्याबद्दल सिलेक्टर्सना शंका नाहीय, पण….
आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी टीममध्ये निवड न होणे, हा सर्फराज खानसाठी एक झटका आहे. त्याचवेळी बीसीसीआयने या खेळाडूला स्पष्ट संदेश दिलाय. टीममध्ये निवड झाली नाही, त्याचा IPL 2023 मधल्या त्याच्या खराब फॉर्मशी काही संबंध नाहीय. शॉर्ट चेंडू खेळताना तो अडचणीत येतो, याचा सुद्धा त्याच्या निवडीशी संबंध नाहीय. सर्फराजन खानच्या क्रिकेट कौशल्याबद्दल सिलेक्टर्सना शंका नाहीय. पण क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टींचा संबंध आहे.
सिलेक्टर्स मूर्ख आहेत का?
बीसीसीआचे सिलेक्टर्स सर्फराज खानच्या फिटनेसवर समाधानी नाहीयत. त्याशिवाय त्याचं मैदानावरील आणि मैदानबाहेरील वर्तनही सिलेक्शन न होण्याला कारणीभूत आहे. शिस्तीचा मुद्दाही सिलेक्टर्सनी लक्षात घेतलाय. “ज्या खेळाडूने 900 पेक्षा जास्त धावा केल्या, त्याचा विचार न करायला सिलेक्टर्स मूर्ख आहेत का?. सर्फराज खानचा फिटनेस आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाहीय. त्याला मेहनत करावी लागेल. वजन कमी करुन अजून फिट व्हाव लागेल. बॅटिंग फिटनेस हा सिलेक्शनचा एकमेव निकष नसतो” असं बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं.
बीसीसीआयने अधिकाऱ्याने काय सांगितलं?
सर्फराज खानने आतापर्यंत 35 इनिंगमध्ये 79.65 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. यात 13 सेंच्युरी आहेत. दोन सीजनमध्ये त्याने 900 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो सिलेक्शनसाठी प्रबळ दावेदार होता. “तुम्ही रागात रिएक्शन दिली समजू शकतो. पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो, सर्फराजकजे दुर्लक्ष करण्यामागे फक्त क्रिकेट हे एकमेव कारण नाहीय. बरीच कारणं आहेत, ज्यामुळे त्याचा विचार केलेला नाही” असं बीसीसीआयने अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं.
सर्फराजकडून काय अपेक्षा?
“सर्फराजच वर्तन सुद्धा लक्षात घेतलं गेलं. त्याने केलेली कृती आणि काही घटना लक्षात घेतल्या गेल्या. त्याने अजून शिस्त पाळण्याची गरज आहे. सर्फराज त्याचे वडिल आणि कोच नौशाद खान यांच्यासोबत त्यावर काम करेल अशी अपेक्षा आहे” असं अधिकाऱ्याने मत व्यक्त केलं.
त्यावेळी चेतन शर्मा तिथे होते
यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली विरुद्ध शतक झळकवल्यानंतर सर्फराज खानने मैदानात सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी चेतन शर्मा स्टँडमध्ये उपस्थित होते. त्यांनी हे पाहिलं. सेलिब्रेशनची ही पद्धत त्यांना पटली नव्हती, अशी माहिती आहे.