आयपीएलमधील निर्धाव चेंडूमुळे होणार पर्यावरणाचं रक्षण, कसं आणि काय ते समजून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेची सांगता झाली आहे. आयपीएल स्पर्धेत पडलेल्या प्रत्येक निर्धाव चेंडू पर्यावरणाचं रक्षणासाठी पुढे येत होता. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी वृक्षारोपण अशी संकल्पना होती. बीसीसीआयने या मोहिमेत दीड लाखाहून अधिक रोपं लावणार असल्याचं जाहीर केलं आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेचा दोन महिन्यांचा थरार अखेर संपला. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं गणित बदलताना क्रीडाप्रेमींनी पाहिलं आहे. अखेर आयपीएलच्या 17व्या पर्वावर कोलकाता नाईट रायडर्सने मोहोर उमटवली आणि स्पर्धेची सांगता झाली. मात्र हा प्रवास इथेच थांबला नाही. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून हा प्रवास आता खऱ्या अर्थान सुरु झाला आहे. प्लेऑफच्या सामन्यात तुम्ही निर्धाव चेंडूचं ग्राफिक्स डॉट ऐवजी झाडाचं चिन्हं पाहिलं असेल. गेल्या वर्षांपासून ही मोहीम सुरु आहे. पण अजूनही या मोहिमेबाबत अनेकांना माहिती नाही. तर प्लेऑफच्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडं अशी संकल्पना होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमी जास्तीत जास्त डॉट बॉल पडावे यासाठी आग्रही होते. आता प्लेऑफच्या चार सामन्यात एकूण किती डॉट बॉल पडले याची उत्सुकता अनेकांना आहे. तर क्वॉलिफायर 1, एलिमिनेटर, क्वॉलिफायर 2 आणि फायनल सामन्यात किती डॉट पडले हे जाणून घेऊयात
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील पहिल्या क्वालिफायरमध्ये एकूण 73 डॉट बॉल टाकण्यात आले.नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात एकूण 74 डॉट बॉल टाकण्यात आले.चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले. या सामन्यात एकूण 96 डॉट बॉल खेळले गेले.चेन्नईच्या एमएम चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल फायनलमध्ये एकूण 80 डॉट बॉल टाकण्यात आले.प्लेऑफच्या एकूण 4 सामन्यात 323 निर्धाव चेंडू गेले.
बीसीसीआयने प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 झाडंचं लक्ष्य ठेवलं होतं. सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन याने 26, कोलकात्याच्या मिचेल स्टार्कने 22, राजस्थानच्या ट्रेंट बोल्टने 21 आणि कोलकात्याच्या हार्षित राणाने 20 बॉल डॉट टाकले. क्वॉलिफायर 1 कोलकाता विरुद्ध हैदराबाद 36500, एलिमिनेटर राजस्थान विरुद्ध बंगळुरु 37000, क्वॉलिफायर 2 हैदराबाद विरुद्ध राजस्थान 48000, कोलकाता विरुद्ध हैदराबाद फायनल 40000 झाडांचं गणित डॉट बॉलच्या माध्यमातून सुटलं आहे. त्यामुळे या एकूण झाडांची बेरीज काढली तर 1,61,500 रोपं लावली जातील. बीसीसीआयच्या टाटासोबत भागीदारीत ही संकल्पना सत्यात उतरवणार आहे. आयपीएल 2023 मध्ये बीसीसीआयने टाटा ग्रुपसोबत 1,47000 झाडं लावली आहेत.