मुंबई | टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा आटोपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयर्लंड दौऱ्याकडे लागलं आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप 2023 ची लगबगही सुरु आहे. टीम इंडियाने विंडिज विरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकली. मात्र टी 20 सीरिज जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करता आला नाही. टीम इंडियाला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 2016 नंतर टी 20 मालिका गमवावी लागली. टीम इंडियाच्या या पराभवामुळे कॅप्टन हार्दिक पंड्या आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्यावर टीका करण्यात आली.
टीम इंडियाने या पराभवातून धडा घेतला आहे. टीम इंडिया जे झाले ते मागे ठेवून पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. तर 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने हेड कोच म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवला नाही, तर हा दिग्गजाचा शेवटचा वर्ल्ड कप असेल.
बीसीसीआयसोबत हेड कोच म्हणून राहुल द्रविड यांच्या कॉनट्रॅक्टची शेवटची तारीख ही 19 नोव्हेंबरला आहे. वर्ल्ड कप फायनल मॅच 19 नोव्हेंबरलाच होणार आहे. आशिया कप आणि वर्ल्ड कपआधी बीसीसीआय सचिव आणि राहुल द्रविड यांच्याच गुप्त चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. ही गुप्त चर्चा 12-13 ऑगस्ट दरम्यान पार पडली, अशी चर्चा आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, राहुल द्रविड आणि जय शाह यांच्यात झालेली ही कथित गुप्त चर्चा जवळपास 2 तास चालली. जय शाह ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथेच ही गुप्त चर्चा झाली. राहुल द्रविड यांनी स्वत: जय शाह यांची भेट घेतली. टीम इंडिया मियामी येथील मॅरियट हॉटेलमध्ये थांबली होती. जय शाह वैयक्तिक कारणाने अमेरिका दौऱ्यावर गेले असता ही गुप्त भेट झाली.