नवी दिल्ली : भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप समाप्त होताच वर्ल्ड कपच शेड्यूल जाहीर झालं आहे. BCCI ने ड्राफ्ट शेड्यूल ICC ला सोपवलय. सर्व सदस्य देशांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर पुढच्या आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होईल. या शेड्यूलमध्ये काय खास आहे? हा प्रश्न आहे. ओपनिंग मॅच, फायनल मॅच, पाकिस्तान विरुद्ध सामना कधी? या सर्व प्रश्नांची उत्तर शेड्यूलमधून मिळतील.
सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा 45 दिवस चालणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपला सुरुवात होईल. याच मैदानावर फायनल सुद्धा होणार आहे. म्हणजे 5 ऑक्टोबरला ओपनिंगची मॅच आणि 19 नोव्हेंबरला फायनल एकाच मैदानात होणार आहे.
वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना कुठल्या टीम विरुद्ध ?
वनडे वर्ल्ड कप 2023 ची ओपनिंग मॅच इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना कधी खेळणार? या टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया आपला ओपनिंग सामना 3 दिवसानंतर म्हणजे 8 ऑक्टोबरला खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा सामना होणार आहे.
सेमीफायनल-फायनल कधी?
BCCI ने शेयर केलेल्या ड्राफ्ट शेड्यूलमध्ये सेमीफायनल व्हेन्यूचा उल्लेख नाहीय. वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला होऊ शकतात. फायनल सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये होईल.
भारताचा विरुद्ध पाकिस्तान सामना किती तारखेला?
आता सर्वांना प्रश्न पडला असेल, भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना कधी होईल? टीम इंडिया किती शहरात आपले सामने खेळणार? त्याबद्दल जाणून घ्या.
भारतीय टीम 8 ऑक्टोबरपासून आपल्या वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात करणार आहे. चेन्नईमध्ये पहिला सामना होईल. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान विरुद्ध दिल्लीत सामना होईल. 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल. म्हणजे साखळी फेरीत भारताचा तिसरा सामना पाकिस्तान विरुद्ध आहे.
पुण्यात कधी होणार सामना?
पाकिस्तान विरुद्ध सामना झाल्यानंतर भारत आपला दुसरा शेजारी बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे. पुण्यात 19 ऑक्टोबरला हा सामना होईल. 22 ऑक्टोबरला टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध धर्मशाळा येथे खेळणार आहे. टुर्नामेंटमध्ये भारत आपला सहावा सामना 29 ऑक्टोबरला लखनौमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे.
मुंबईत सामना कधी?
त्यानंतर क्वालिफाय करणाऱ्या टीम विरुद्ध टीम इंडिया 2 नोव्हेंबरला मुंबईत मॅच खेळेल. 5 नोव्हेंबरला टीम इंडिया कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. 11 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये भारत आपला शेवटचा लीग सामना खेळेल.