“जो कोणी समोर येईल त्याला खाऊन टाकणार”, टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला अली खानचं ओपन चॅलेंज
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाकडून क्रीडाप्रेमींना बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्यावर किती ठामपणे मैदानात उतरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. असं असताना वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला ओपन चॅलेंज मिळालं आहे. साखळी फेरीत धुव्वा उडवण्यासाठी अली खान आणि त्याचा संघ सज्ज झाला आहे.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 20 संघांनी कंबर कसली आहे. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारत या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. टीम इंडियाला आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची आणखी एक संधी आहे. त्यात टीम इंडियाच्या गटात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड हे संघ आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीत टीम इंडिया सहज जागा मिळवेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण या गटातील लिंबूटिंबू संघांना कमी लेखनं टीम इंडियाला महागात पडू शकतं. कारण स्पर्धेत कधी काय होईल सांगता येत नाही. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला याची अनुभूती आली आहे. साखळी फेरीतच टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागला होता. राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाचं हासं झालं होतं. बांगलादेश, श्रीलंका या देशांनी भारताचं साखळी फेरीतच तिकीट कापलं होतं. त्यामुळे ताकंही फुंकून पिण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. असं असताना टीम इंडियाला स्पर्धेपूर्वीत पराभवाची धमकी मिळाली आहे. आयर्लंड, पाकिस्तानशी दोन हात झाल्यावर 12 जूनचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
12 जूनला भारत आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खान याने थेट इशारा दिला आहे. भारतासह गटात असलेल्या इतर संघांनाही त्याने आखड्यात लोळवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या धमकीवजा इशाऱ्याने क्रीडाप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अमेरिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेत आहे. या स्पर्धेपूर्वी अमेरिकन संघ बांगलादेशसोबत टी20 मालिका खेळत आहे. अमेरिकेने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सलग दोन सामन्यात बांगलादेशला लोळवलं आहे. पहिल्या सामन्यात 5 विकेट आणि दुसऱ्या सामन्यात 6 रन्सने पराभूत केलं आणि मालिका जिंकली.
या मालिकेत वेगवान गोलंदाज अली खान याच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात अली खानने 25 धावा देत 3 गडी बाद केले. यात शाकिब अल हसनची विकेटही होती. या विजयानंतर अली खानने अमेरिकेने मिळवलेला विजय हा काही तुक्का नव्हता. तर टीममध्ये तितकी क्षमता आहे. अली खानने पुढे सांगितलं की, “टीमला विजयाची भूक लागली आहे आणि जो पण समोर येईल त्याला अमेरिकन टीम खाईल.” त्यामुळे अमेरिकन टीम या स्पर्धेत उलटफेर करत कोणाला दणका देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.