पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत बेन स्टोक्स विचित्र पद्धतीने बाद, खेळाडूचं डोकं फुटताफुटता राहिलं; पाहा व्हिडीओ
पाकिस्तानला अखेर घरच्या मैदानावर विजयाची चव चाखता आली आहे. मुल्तानमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा 152 धावांनी धुव्वा उडवला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ 144 धावांवर बाद झाला. या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स विचित्र पद्धतीने बाद झाला.
पाकिस्तानने 1348 दिवसानंतर घरच्या मैदानावर विजयाचं तोंड पाहिलं आहे. इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने दबाव टाकला होता. मात्र पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याने दुसऱ्या डावात सर्वाधिक 37 धावा केल्या. इंग्लंडच्या 88 धावांवर 6 विकेट गेल्या होत्या. त्यामुळे संघावरील दडपण दूर करण्यासाठी बेझबॉल रणनितीनुसार बेन स्टोक्स आक्रमक पवित्रा आजमावत होता. पण त्या खेळीत स्वत:च फसला आणि यष्टीचीत होत तंबूत परतला. बेन स्टोक्सने डावखुऱ्या नौमान अलीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा टप्पा खेळपट्टीवर पडताच मोठा टर्न झाला. त्यामुळे त्या चेंडूवर प्रहार करण्यासठी बेन स्टोक्सने जोरदार प्रहार केला. पण शॉटसाठी पुढे गेलेल्या बेन स्टोक्सच्या हातून बॅट सटकली.
बेन स्टोक्सच्या हातून बॅट सटकल्यानंतर ती खूप दूर पडली. यावरून त्याने शॉट्ससाठी किती ताकद लावली होती याचा अंदाज येतो. विकेटकीपर मोहम्मद रिझवानने या संधीचं सोनं करत त्याला स्टम्पिंग केलं. यष्टीचीत होताच बेन स्टोक्स मात्र इथे तिथे पाहू लागला. त्याच्या हातून सुटलेली बॅट खेळाडूला लागू शकली असती. खासकरून शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खेळाडूला धोका होता. सुदैवाने बेन स्टोक्सची बॅट कोणत्या खेळाडूला लागली नाही.
The bat goes flying and Rizwan does the rest behind the stumps 🎯
Noman Ali outfoxes the England captain ☝️#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/Q2a2GtfmsV
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 18, 2024
इंग्लंडच्या पराभवानंतर कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या चुकीबाबत संघातील खेळाडूंची माफी मागितली. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात खेळाडूंकडून काही झेल सुटले होते. त्यामुळे बेन स्टोक्स खूपच नाराज झाला होता. यावेळी त्याने खेळाडूंची भर मैदानात खरडपट्टीही काढली होती. पण स्टोक्सने खेळ भावनेचा आदर करत रात्री सर्व खेळाडूंची माफी मागितली. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा कसोटी सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे. हा मालिका विजयासाठी महत्त्वाचा सामना आहे. हा सामना ड्रॉ झाला तर मालिका बरोबरीत सुटेल. दुसरीकडे, जिंकणारा संघ मालिका खिशात घालेल.