INDvsAUS | चौथ्या कसोटीतून स्टार खेळाडू ‘आऊट’, टीमला मोठा झटका!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला मॅचविनर खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीमची अडचण वाढली आहे.
मुंबई | ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. तर आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिममध्ये 9 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. चौथ्या आणि निर्णायक सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर होऊ शकतो. या खेळाडूला तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळता आलं नव्हतं.
ऑस्ट्रेलियाला नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर जोरदार मुसंडी मारत इंदूरमध्ये टीम इंडियावर 9 विकेट्सने विजय मिळवला. आता टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी अहमदाबाद कसोटी जिंकावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला तिसऱ्या सामन्यानंतर चौथ्या कसोटीतही खेळता येणार नसल्याचं समजतंय. पॅटला तिसऱ्या कसोटीतून रिलीज करण्यात आलं होतं. पॅटच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने तो सिडनीला परतला होता. मात्र आता पॅटला चौथ्या कसोटीतही खेळायला जमणार नसल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे तिसर्या कसोटीप्रमाणे तिसऱ्या कसोटीतही स्टीव्ह स्मिथ यालाच कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते.
स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया
“आता माझी वेळ संपली आहे. आता ही टीम पॅटची आहे. भारतात मला कॅप्टन्सी करायला आवडतं. कर्णधारपद हे बुद्धीबळाप्रमाणे आहे, जिथे प्रत्येक क्षणाला महत्व आहे. फलंदाजांना वेगवेगळ्या पद्धतीने खेळायला भाग पाडणं आणि त्यांच्यासोबत खेळणं हे मजेशीर आहे”, असं स्टीव्हने तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर स्पष्ट केलं होतं.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.