भुवनेश्वर कुमार याची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा! असं काय झालं की सोशल मीडियावर रंगली चर्चा
भारतीय वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यातील भुवनेश्वर कुमार याच्या निवृत्तीची आता जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावरील एका बदलामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं काय झालं ते वाचा...
मुंबई : टीम इंडियातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या काही दिवसांपासून संघाचा भाग नाही. आयपीएल स्पर्धेतही त्याची चमक दिसली पण त्याला संधी मिळाली नाही. मागच्या वर्षी टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत लाजिरवाण्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला पाठ दाखवली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही त्याची वर्णी लागणार नाही, हे जवळपास निश्चितच आहे. कारण त्याच्या नावाची कुठेच चर्चा नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही त्याला वगळण्यात आलं आहे. तसेच नवोदित खेळाडूंना संधी दिली जात आहे. असं असताना भुवनेश्वर कुमार याने सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या निवृत्तीचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याला कारणंही तसंच आहे
भुवनेश्वर कुमार याने नेमकं काय केलं?
भुवनेश्वर कुमार याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या अपडेट बाबत ही चर्चा आहे. कारण त्याने आपल्या प्रोफाईल बायोमध्ये ‘भारतीय क्रिकेटर’ ऐवजी ‘भारतीय’ असं लिहिलं आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार लवकरच राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती किंवा भविष्यातील काही घडामोडींबाबत जाणून घेण्यासाठी फॅन्स आणि क्रीडाप्रेमींना भुवनेश्वर कुमार किंवा बीसीसीआयच्या अधिकृत वक्तव्याची वाट पाहावी लागणार आहे.
Bhuvneshwar Kumar changed his bio from Indian cricketer?? to Indian?? pic.twitter.com/XLKIdcFKO3
— Gaurav Agarwal (@7Gaurav8) July 27, 2023
क्रिकेटलाउंजच्या बातमीनुसार, भुवनेश्वर कुमार यावेळेस बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे. आयर्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी 20 सीरिजनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. आयर्लंडचा दौरा ऑगस्टच्या शेवटी होणार आहे.
भुवनेश्वर कुमार याने टी20 वर्ल्डकपनंतर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला संघात स्थान दिलेलं नाही. 33 वर्षीय भुवनेश्वर कुमार याला वनडे वर्ल्डकपमधून डावलल्यास तरुण गोलंदाजांवर अवलंबून राहावं लागेल.
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीची जबाबदारी वाढली आहे. तर मुकेश कुमार, उमरान मलिक, अर्शदीप सिंह आणि कुलदीप सेन यांची पारख केली जात आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारला संघात जागा नसल्याचं दिसत आहे.
भुवनेश्वर कुमार याची क्रिकेट कारकिर्द
भुवनेश्वर कुमार 21 कसोटी, 121 वनडे, 87 टी 20 सामने खेळला आहे. यात कसोटीत 63, वनडेत 141 आणि टी 20 मध्ये 90 गडी बाद केले आहेत. दुसरीकडे 160 आयपीएल स्पर्धा खेळला असून 170 गडी बाद केले आहेत.