पाकिस्तानला टी20 वर्ल्डकप 2026 साठी मोठा धक्का, दोन वर्षे अमेरिकेकडून मिळालेल्या पराभवाची सोसावी लागेल सळ
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतून पाकिस्तानला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची नाचक्की झाली. आता साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने पुढची सर्व गणित फिस्कटली आहेत. 2026 वर्ल्डकप आधीच पाकिस्तानला धक्का बसला आहे.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत धडक मारून अमेरिकेने इतिहास रचला आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्याच फटक्यात अमेरिकेने मोठी कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या या कामगिरीचा पाकिस्तानला फटका बसला आहे. एकतर साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसरं दोन वर्षांनी होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी थेट एन्ट्री मिळणार नाही. 2026 ला टी20 वर्ल्डकप भारत आणि श्रीलंका या देशात होणार आहे. दोन देशांकडे यजमान पद असल्याने श्रीलंकेला साखळी फेरीतून बाद झाल्यानंतरही डायरेक्ट एन्ट्री मिळेल. पण पाकिस्तानला या स्पर्धेत थेट एन्ट्री मिळणं कठीण आहे. दोन पैकी एका ठिकाणी पात्र झालं तरच तिकीट मिळू शकतं. एक क्वॉलिफायर्स स्पर्धेत विजय मिळवून पाकिस्तानला टी20 वर्ल्डकपमध्ये जागा मिळवता येणार आहे. दुसरं आयसीसी टी20 क्रमवारीतील स्थानावरून काय ते स्पष्ट होईल. अशीच स्थिती न्यूझीलंडही असणार आहे.
आयसीसी नियमानुसार, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत जागा मिळवणाऱ्या संघांना पुढच्या वर्ल्डकपमध्ये थेट एन्ट्री मिळेल. आता ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या संघांनी सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. दोन जागांसाठी स्कॉटलँड आणि इंग्लंड, बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यत चुरस आहे. सध्याचं सुपर 8 चित्र आणि यजमान पद पाहता भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांनी टी20 वर्ल्डकप 2026 साठी क्वॉलिफाय केलं आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. यात भारत श्रीलंका हे दोन यजमान पात्र ठरले आहेत. आता उरले एकूण 18 संघ. आता टी20 वर्ल्डकप 2024 सुपर 8 फेरीतील (भारत वगळता इतर सात) संघ पात्र होतील. म्हणजे हे वगळता 11 संघ उरले. या शिवाय 30 जून 2024 पर्यंत आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघांपैकी तीन संघांना संधी मिळेल. आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ कोणत्या स्थानावर असतील यावर सर्वकाही ठरेल. पण क्रमवारीत घसरण झाली तर मात्र क्वॉलिफायर फेरीला सामोरं जावं लागेल. आता वरचं सर्व गणित पाहता 8 संघ उरले. या 8 संघांसाठी पात्रता फेरीतील संघांना संधी मिळेल.