टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी ‘या’ पक्षाकडून लोकसभा निवडणुकीला उभा राहणार का?
आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपने विरोधकांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावायला सुरूवात केली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. आता यावर शमी काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या आधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. जागावाटपासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. भाजपमध्ये इंडिया आघाडीतील बडे मोहरे पक्षप्रवेश करत असल्याने आघाडीचं डॅमेज करण्याचंही काम सुरू आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकामध्ये भाजपने अब की पार 400 पारचा नारा दिला आहे. भाजप प्रत्येक जागेसाठी पूर्ण ताकद लावताना दिसत आहे. अशातच भाजप आगामी निवडणुकीमध्ये हुकमी एक्का वापरणार असल्याचं दिसत आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूला उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात
भाजप टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला परराज्यात लोकसभा निवडणुकीसाठी उतरवणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. हा खेळाडू असा आहे ज्याने आताचा पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये राडा घातला होता. टीम इंडियाला आपल्या कामगिरीच्या जोरावर सामने जिंकून दिले होते. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर मोहम्मद शमी आहे. शमी टीम इंडियाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. वर्ल्ड कपमध्ये शमी याने काय केलं होतं याची वेगळी माहिती द्यायला नको.
‘या’ राज्यातून उमेदवारी देण्याची शक्यता
मोहम्मद शमी हा मुळ उत्तर प्रदेशमधील असून त्याचा जन्मही येथेच झाला होता. मात्र शमी याने रणजी क्रिकेट हे बंगालकडून खेळले. रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना शमीला वेगवान गोलंदाज म्हणून राष्ट्रीय ख्याती मिळाली आणि तो अजूनही बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. पश्चिम बंगालमधून शमी याला भाजप तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजत आहे.
दरम्यान, भाजप शमीला बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक समाज आहे. शमीसोबत भाजपच्या वरिष्ठांनी याबाबत चर्चा केली होती आणि ही चर्चा सकारात्मक ठरल्याची माहिती आहे. यावर शमी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.