कॅप्टन्सी मिळताच इशान किशनचा धमाका, शतकासह उघडणार टीम इंडियाचे दार!
बीसीसीआयच्या दट्ट्यामुळे देशांतर्गत क्रिकेटचं पुन्हा एकदा महत्त्व वाढलं आहे. दिग्गज खेळाडू खेळत असल्याने स्पर्धांचं वजन वाढलं आहे. बुची बाबू ही देखील देशातील नामांकित स्पर्धा आहे. या स्पर्धेत विकेटकीपर बॅट्समन इशान किशनचा धमाका पाहायला मिळाला. इशानने जबरदस्त खेळीसह पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. दरम्यान झारखंडने मध्यप्रदेशवर 25 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
बुची बाबू 2024 स्पर्धा सुरू असून मध्य प्रदेश आणि झारखंड क्रिकेट असोसिएशन हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मध्य प्रदेशच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेश संघाने 91.3 षटकात 10 गडी गमवून 225 धावा केल्या. अरहाम अकीलने 57 आणि शुभम कुशवाहने 84 धावांची खेळी केली. तर झारखंडकडून शुभम सिंहने 3, सौरभ शेखरने 3 , विवेकानंद तिवारीने 2 आणि आदित्य सिंगने 2 गडी बाद केले. असं असताना सर्वांचं लक्ष इशान किशनकडे लागून होतं. इशान किशन कशी फलंदाजी करतो? तसेच टीम इंडियाची दारं त्याच्यासाठी खुली होणार का? असे एक ना अनेक प्रश्न होते. पण इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली आणि लक्ष वेधून घेतलं. त्याच्या या खेळीमुळे पुन्हा एकदा टीम इंडियासाठी विचार होऊ शकतो.
शिखर मोहन शून्यावर बाद झाल्यानंतर झारखंडचा संघ दबावात आला होता. पण विकाश विशाल आणि शरन्दीप सिंगने मोर्चा सांभाळला. दुसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली. शरन्दीप बाद झाल्यानंतर कुमार सुरज काही खास करू शकला नाही. 24 धावा करू तंबूत परतला. त्यानंतर आदित्य सिंगने 33 धावा करत संघाच्या धावसंख्येत भर पाडली.पण या सामन्यात खरी रंगत आणली ती इशान किशनने..आक्रमक खेळी करत मध्य प्रदेश संघाला सळो की पळो करून सोडलं. 86 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. 92 धावांवर असताना इशान किशनने सलग दोन षटकार मारत शतक पूर्ण केलं. इशान किशनने 107 चेंडूत 106.54 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 10 षटकार मारले. या खेळीसह इशान किशनने टीम इंडियाचं दार पुन्हा एकदा ठोठावलं आहे.
दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यानंतर इशान किशनचे तारे फिरले होते. आयपीएल 2024 स्पर्धेतही काही खास करू शकला नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याचा विचार झाला नाही. तसेच बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या आव्हानाला केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळलं होतं. अखेर त्याला उपरती झाली आणि देशांतर्गत क्रिकेटसाठी सज्ज झाला. पहिल्याच सामन्यात इशान किशनने शतकी खेळी करत आपण टीम इंडियातील दावेदार असल्याचं दाखवून दिलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मध्य प्रदेश : अक्षत रघुवंशी (कर्णधार), अरहाम अकील, विकास शर्मा (विकेटकीपर), शुभम कुशवाह, अनिकेत वर्मा, चंचल राठोर, माधव तिवारी, अधीर सिंग, पारुष मंडळ, रामवीर गुर्जर, आकाश राजवत
झारखंड क्रिकेट असोसिएशन : इशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), रवि यादव, सौरभ शेखर, आदित्य सिंग, विवेकानंद तिवारी, मनिषी, शुभम सिंग, कुमार सुराज, शिखर मोहन, विकास विशाल, शरन्दीप सिंग.